Devendra Fadnavis  Pudhari
मुंबई

BMC Car Proposal: मुंबई महापालिकेतील गाड्यांच्या प्रस्तावावर फडणवीसांचा संताप; भाजप नेत्यांची कानउघाडणी

मुंबई महापालिकेतील समिती अध्यक्षांसाठी नवीन गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचा विरोध

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या इनोव्हा गाड्या उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित भाजप नेत्यांची कानउघाडणी केली आहे. जनतेचा पैसा विकासकामांवरच खर्च झाला पाहिजे, जनतेच्या पैशांची कुठेही उधळपट्टी करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावल्याचे समजते.

पालिकेतील वाहने घेण्याच्या या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर ब्रीफिंग घेतले. त्या वेळी पालिकेतील उधळपट्टीच्या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना जनतेप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

ज्यांनी २५ वर्षे महापालिकेच्या सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना बाजूला सारून जनतेने आपल्याला संधी दिली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी पालिकेचा निधी हा नागरी सुविधा आणि विकासकामांवरच केंद्रित झाला पाहिजे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिकेत भाजपचा कारभार पाहणाऱ्या नेत्यांना दिल्या.

दुसऱ्या बाजूला, महापालिकेतील वाहनांच्या या वादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. उपमहापौर, वैधानिक तसेच विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी प्रशासनाने भाडेतत्त्वावर स्कॉर्पिओ गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.

मात्र, या गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान पाठ दुखत असल्याच्या तक्रारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनीच केल्या होत्या, असा दावा सभागृह नेते गणेश खणकर यांनी अलीकडेच केला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवरूनच स्कॉर्पिओ ऐवजी इनोव्हा गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव समोर आणला गेला. परंतु, आता विरोधकच यावरून राजकारण करत असल्याचा आरोपही खणकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT