मुंबई

Devendra Fadnavis : "काळजी त्‍यावेळेस वाटेल..." : एकनाथ शिंदे यांच्‍या दिल्‍ली दौर्‍यावर CM फडणवीसांची मिश्‍कील टोलेबाजी

रालोआ सरकारमधील घटक पक्षांमधील समन्‍वयाची भूमिकाही केली स्‍पष्‍ट

पुढारी वृत्तसेवा

Devendra Fadnavis on Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन जोपर्यंत आमच्या नेत्यांना भेटतात, तोपर्यंत काळजीचे कारण नाहीये. मात्र शिंदे दिल्लीत इतर पक्षांच्या नेत्यांना भेटायला जेव्हा सुरुवात करतील, तेव्हा काळजीचे कारण असेल," अशा शब्‍दांमध्‍ये मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्‍या दिल्‍ली दौर्‍यावर मिश्‍कील टोलेबाजी केली. ‘पुढारी न्यूज’च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत महासमिटचं कार्यक्रमात ते बोलत होते.

खरं तर ही आमच्‍याकरता आनंदाची गोष्‍ट

‘पुढारी न्यूज’च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत महासमिटचं आयोजनात बोलताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले की, "एकनाथ शिंदे हे दिल्‍लीमध्‍ये जातात. तेथे ते कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर कधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात. खरं तर ही आमच्‍याकरता आनंदाची गोष्‍ट आहे."

शिवसेना रालोआतील प्रमुख घटक पक्ष

देशात राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)चे सरकार आहे. शिवसेना हा राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी पक्षातील एक प्रमुख घटक पक्ष आहे. या पक्षाचे एकनाथ शिंदे प्रमुख आहेत. दिल्‍लीत रालोआ पक्षांच्या संदर्भात सातत्याने वेगवेगळ्या बैठका होत असतात. घटक पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलावलं जातं. अनेक वेळा मला बोलवणं नसतं, कारण ती घटक पक्षाच्या प्रमुखांची बैठक असते; त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बैठकीसाठी बोलवले असते," असेही मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले.

"काळजी त्‍यावेळेस वाटेल..."

"एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जोपर्यंत आमच्या नेत्यांना भेटतात, तोपर्यंत काळजीचे कारण नाही; मात्र काळजी त्यावेळेस वाटेल ज्यावेळी आमच्या नेत्यांच्या ऐवजी दुसऱ्या नेत्यांना ते भेटतील." अशी मिश्‍कील टोलेबाजी करत माझ्‍या ऐवजी एकनाथ शिंदे दिल्‍लीला आमच्‍या नेत्‍यांना भेटायला गेले तर मला आनंदच आहे," असेही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT