मुंबई : मातोश्रीचे दरवाजे मी नाही तर त्यांनीच बंद केले. उद्धव ठाकरे आता म्हणतात की दारे उघडी आहेत, पण आता मला कोणत्याही दरवाजाची लालसा उरलेली नाही. माझ्यासाठी आता मुंबईकरांच्या, महाराष्ट्राच्या हृदयाचे दरवाजे उघडले आहेत आणि तीच माझी ताकद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर आरोप आणि टीका बंद केल्यास फडणवीसांना मातोश्रीचे दार उघडतील, असे विधान ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान केले होते.
या विधानाचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, इतक्या वर्षात मी मातोश्रीची कोणती बदनामी केली. मी बोललेले एक विधान दाखवा. मी विरोधी पक्षनेता असताना आदित्य ठाकरेंवर मला विचारले गेले. मी एकमेव विरेोधी पक्षनेता होतो, मी म्हटले मला असे वाटत नाही. त्यामुळे मी कधीही कमरे खालचे आरोप करत नाही. पण,त्यांच्या लोकांनी माझ्याविरोधात माझ्या पत्नीविरोधात खालच्या स्तरावर जाऊन बदनाम केले. आमच्याबद्दल अश्लील लिहिले. पुरावे आहेत. तरीही मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मातोश्रीचे दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावे की, ते दार मी नाही तर त्यांनीच बंद केले होते. मी वारंवार फोन करत होतो, पण त्यांनी फोन घेण्याचेही सौजन्य दाखवले नाही.
तमिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेले विधान गांभीर्याने घ्यायची गरज नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादंगावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई हे एक आंतराष्ट्रीय शहर असल्याचे म्हणताना त्यांना हे शहर महाराष्ट्राचे नाही असे म्हणायचे नव्हते. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, इतकेच त्यांना म्हणायचे होते. महाराष्ट्राचे नाही असे त्यांना म्हणायचे नव्हते. अण्णामलाई यांच्या विधानावरून उड्या मारण़ाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, बॉम्बेचे मुंबई करणारे भाजपचे राम नाईक आहेत. तुम्ही नाही, तुमचा पाठिंबा असला तरी या नामकरणासाठी सर्व कायदे करण्याची कामगिरी राम नाईकांनी पार पाडली.