विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  pudhari photo
मुंबई

Maharashtra Municipal Corporation Results : विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झंझावाती प्रचार, योग्य नियोजन, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

देशाच्या आर्थिक राजधानीवर परंपरागत मित्र ठाकरे समवेत नसताना आणि शिवसेना शिंदे गटाची कामगिरी फार चमकदार घडली नसताना मिळवलेला विजय आणि महाराष्ट्राच्या नागरी भागांतील 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये मिळवलेले यश यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

2019 साली निवडणूक जिंकूनही मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने सत्तेच्या राजकारणाबाहेर फेकले गेलेले देवेंद्र फडणवीस आज सिकंदर ठरले असून त्यांच्या रणनीतीने पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकण्याचा दिवस हा ऐतिहासिक अक्षरात कोरला जाणार असून ज्या महानगरात भाजपचा जन्म झाला, तेथे आता या पक्षाचा महापौर बसणार हे आता स्पष्ट दिसत आहेत.

गेल्या दहा दिवसांत केलेला झंझावाती प्रचार, दररोज रात्री उशिरा मुंबईत परतून पक्षाचे उमेदवार विजयी व्हावे यासाठी आखलेली रणनीती, सहकारी मित्रांच्या चुका झाल्यानंतर त्यांना शांतपणे सावरून घेत केलेली दुरुस्ती, लातुरात जाऊन मागितलेली माफी, पक्षातील प्रत्येक घडामोडीचा अंदाज घेत टाकलेली यशस्वी पावले यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरुक्ती केलेली आहे. त्यावेळी त्यांच्या समवेत असलेले सहकारी एकनाथ शिंदे काही ठिकाणी, तर अजित पवार पुणे, पिंपरी-चिंचवड या महत्त्वाच्या महापालिकात विरोधात होते.

या दोन्ही नेत्यांच्या यशापेक्षा यावेळी फडणवीस यांनी केलेली कामगिरी नेत्रदीपक आहे. मुंबईत शिंदे यांना न दुखावता त्यांनी मागितलेल्या जागा देणे, नवी मुंबईत त्यांना आव्हान देणे, कल्याण-डोंबिवलीत सांभाळून घेणे, ठाणेमध्ये त्यांना मुक्त हात देणे अशा अनेक भूमिका योग्य पद्धतीने राबवत फडणवीस यांनी महाराष्ट्रात आपला शब्द चालतो हे सिद्ध करून दाखवले आहे.

फडणवीस यांच्या दरबारात नियोजनकार किंवा त्यांचे निर्णय राबवण्याची शक्ती असलेले महत्त्वाचे नेते कमी आहेत अशी चर्चा असते. फडणवीस एकट्यानेच योग्य ते निर्णय घेतात अशी टोमणेवजा कुजबूजही चालत असते. मात्र यावेळी मुंबईसाठी आशिष शेलार, अमित साटम हे दोन नेते आणि महाराष्ट्रासाठी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण अशा सहकाऱ्यांना हाताशी घेत त्यांनी निवडणुकीचे स्क्रिप्ट लिहिले, अनेकविध मार्गांचा वापर करीत ते जनतेपर्यंत पोहोचवले.

माध्यमांना दिलेल्या मुलाखती तसेच सेलिब्रिटी तारे,तारकांशी साधलेला संवाद अशा अभिनव पद्धतीने त्यांनी ठाकरे ब्रँडवर मात केली हे आज निकालांनी सिद्ध झाले आहे. हे यश मिळवताना त्यांनी कुठल्याही स्पर्धकाबद्दल अपशब्द वापरले नाहीत. त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्याची पुनरावृत्ती करत स्वतःभोवती एक सुडाचे वातावरणही निर्माण केले नाही. दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी ही निवडणूक तुमच्या पद्धतीने लढा अशी मुभा फडणवीस यांना दिली होती असे म्हणतात. त्याचा योग्य तो वापर करत एकही केंद्रीय नेता प्रचारात आला नसताना फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाला विजयापर्यंत पोहोचवून दिले.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गेल्यानंतर अत्यंत कृतज्ञ भाषा बोलत त्यांनी या विजयाने उन्मत्त होऊ नका, तर जनसेवेला तयार व्हा, असाही संदेश दिला आहे. कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालणारा देवाभाऊ असे चित्र निर्माण करत फडणवीस यांनी स्वतःवरील अनेक आक्षेप न बोलता खोडून टाकले आहेत. अजितदादा पवार यांच्याशी असलेले सख्य पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रचारात दूर ठेवत त्यांनी योग्य ते उत्तरे योग्य वेळेला देऊ असे सांगितले. ठाकरे ब्रँडला लक्ष करत भाजपचे जनसमर्थन वाढवून देणे हा कौतुकाचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT