मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये रविवारी दाखल झाले. राज्याला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढावा, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटींचे नियोजन केले आहे. येत्या पाच दिवसांत गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होतील.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्रातील अर्थ तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी दावोसमध्ये दाखल झाले आहेत.
जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहात आहे. महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल वेगवान करण्यासाठी दावोस येथील परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दावोस येथे दाखल झाल्यानंतर स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी त्यांचे स्वागत केले. बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून फडणवीस यांचे उत्स्फूर्तपणे मराठी पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेशात, ढोल-ताशांच्या गजरात मराठीजनांनी केलेल्या स्वागताबद्दल फडणवीस यांनी आभार मानले. या कार्यक्रमात ‘स्वागत देवाभाऊ’ असा फलक लागला होता.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांच्यासह मराठी मंडळांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले.
राज्यात आपण महा-एनआरआय फोरम तयार केला असून, त्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोणत्याही प्रगतीचा मूलभूत विचार हा सांस्कृतिक वैभव जपण्याचा असतो. त्यातूनच भौतिक प्रगती साध्य होत असते. आता मुंबईच्या विकासाचे आणखी ठोस नियोजन आपण हाती घेतले असून पुढच्या 5 वर्षांत विकसित राष्ट्रांच्या राजधानींपेक्षा आपली मुंबई अधिक प्रगत असेल. कोणत्याही देशात जा, तेथे मराठी माणूस आज प्रगती करतो आहे. मेहनती आणि विश्वासार्ह हीच त्याची ओळख आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड’तर्फे आयोजित स्वागत समारंभात बोलताना सांगितले.