

मुंबई : अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि उत्पादन यांसह प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत व्यापक चर्चा झाली.
या भेटीचा मुख्य भर अमेरिका आणि महाराष्ट्र यांच्यातील भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी सामायिक धोरणात्मक प्राधान्यांवर होता. मनोरंजन, तंत्रज्ञान, उत्पादन, ऊर्जा आणि आरोग्य या क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
गोर यांनी सांगितले, आम्ही अमेरिका आणि महाराष्ट्र यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आमच्या सामायिक धोरणात्मक प्राधान्यांवर चर्चा केली. आपण मिळून खूप काही करू शकतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या चर्चेत महाराष्ट्रात अमेरिकन गुंतवणूक वाढवणे आणि राज्यातील कंपन्यांना अमेरिकेत आपला विस्तार करण्यासाठी प्रोत्साहित करणे यांसारख्या विविध विषयांचा समावेश होता. अमेरिका-महाराष्ट्र भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही बाजूंनी अधिक जवळून काम करण्यावर एकमत झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, गोर यांनी शनिवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचीही भेट घेतली. यामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढते सहकार्य आणि अत्याधुनिक अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत चर्चा झाली.