Deven Bharti appointment Mumbai Police Commissioner
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई पोलीस आयुक्तालयाचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३०) याबाबतची घोषणा केली. भारती १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आज मुंबई पोलीस आयुक्त पदावर भारती यांची वर्णी लावण्यात आली आहे. भारती यांची निम्मी अधिक पोलीस दलातील सेवा मुंबईत झाली आहे. मुंबईचा खडांखडा माहिती त्यांना आहे. गुन्हे शाखेपासून सह पोलीस आयुक्त गुन्हे, विशेष पोलीस आयुक्त आणि इतर महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
बिहारमधील १९९४ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी भारती २०२३ पासून मुंबई पोलिस विशेष आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. हे पद महायुती सरकारने निर्माण केले होते. मुंबईतील २६/११ हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्व भारती यांनी केले होते.
त्यांनी मुंबईत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी मुंबईत सर्वात जास्त काळ संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून काम केले आहे. त्यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) म्हणूनही काम पाहिले आहे. महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.