मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील सुमारे १८५ लाख मेट्रिक टन साचलेला जुना कचरा आता शास्त्रीय पद्धतीने हटविण्यात येणार आहे. यासाठी राबवण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेत नवयुग इंजिनिअरिंग कंपनी पात्र ठरली आहे.
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचरा हटविणे या टेंडरसाठी कंपनीने मूळ दरापेक्षा कमी दर सुचवला होता. अखेर पालिकेने कंपनीची नियुक्ती केल्याने आता देवनार डम्पिंगवरील जुन्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रियेला वेग येणार आहे. यासाठी महापालिकेला २ हजार ५४० कोटी रुपये खर्च करणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
राज्य सरकारने देवनार डम्पिंग ग्राउंडमधील १२४ एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या जागेत कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाणार आहे. तीन वर्षांत ही जागा रिकामी केली जाणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेला शेवटच्या दिवसापर्यंत तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. अखेर हे काम नवयुग इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला मिळाले असून त्यांनी महापालिकेच्या अंदाजित खर्चाच्या तुलनेत ७.२९ टक्के कमी दर सुचवला होता.
राज्य सरकारने पाच-सहा महिन्यांपूर्वी देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील २३५ एकरपैकी मुंबई महापालिकेस आवश्यक असलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रापैकी १२४ एकर जागा धारावी पुनर्विकासाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील ७५ एकरवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबवला जाणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ मध्ये कार्यान्वित होईल. तर उर्वरित जागा महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारने देवनारची जागा ९९ वर्षाच्या भाडेतत्त्वावर मुंबई महापालिकेला दिली होती. शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार पालिकेला ही जागा तीन वर्षांत रिकामी करावी लागणार आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट पालिकेच्या घनकचऱ्यातून वीजनिर्मिती करणे हा आहे.