

मुंबई : हा धारावी पुनर्विकास आहे की देवनार डम्पिंगची डील आहे? 2368 कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा? असा प्रश्न काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई महापालिकेवर 2368 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक भार टाकण्यात आला आहे. प्रकल्पातून अपात्र ठरणार्या धारावीतील नागरिकांना भाड्याच्या घरांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून, यासाठी अदानी धारावी पुनर्विकास प्रा. लि. तब्बल 50,000 घरे उभारणार आहे. मात्र ही घरे बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून देवनार डम्पिंग ग्राउंड खाली करण्याचा प्रस्ताव 2024 मध्ये मंजूर करण्यात आला, अशी माहिती पटोले यांनी दिली.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देवनार डम्पिंग ग्राउंड अदानीला देण्याचा निर्णय झाला. 1927 पासून अस्तित्वात असलेल्या देवनार डम्पिंग ग्राउंडवर 185 लाख मेट्रिक टन कचरा साचलेला आहे. आता मुंबई महापालिकेवर या कचर्याच्या सफाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ज्यासाठी 2368 कोटी रुपये खर्च होणार आहेत. दररोज तब्बल 23000 मेट्रिक टन कचरा उचलण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी घनकचरा व्यवस्थापनातील आतापर्यंतचे सर्वात मोठे टेंडर तीन वर्षांसाठी काढण्यात आल्याचे पटोले म्हणाले.
घरे अदानी बांधणार, जागा महापालिकेने मोकळी करून द्यायची, आणि त्यासाठीचा सर्व खर्चदेखील मुंबईकरांच्या आणि राज्यातील जनतेच्या कररूपातील पैशातून. ही योजना खरोखरच लोकहिताची आहे का? असे पटोले म्हणाले.
धारावीच्या प्रकल्पग्रस्तांना सुरुवातीला समुद्रकिनारी पुनर्वसनाचे स्वप्न दाखवण्यात आले होते, पण आता देवनारमध्ये स्थलांतर करण्याचे नियोजन सुरू आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
ही संपूर्ण योजना म्हणजे सरकार आणि महापालिकेने कचर्यातूनही कमाई करण्याचा डाव आहे का? मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, असेही नाना पटोले म्हणाले.