Maharashtra Legislative Session Devendra Fadnavis On Bhonge
मुंबई : मुंबईला भोंगे मुक्त करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. उर्वरीत महाराष्ट्रातील भोंगे बंद करण्यात येतील. त्यासाठी संबंधितांना कायद्याचे पालन करण्यासाठी सुचना देण्यात येतील. राज्यात कुठेही विना परवानगी भोंगे लावल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. त्याचबरोबर भोंग्यांच्या दंडातील अर्धी रक्कम तक्रारदाराला देण्यात येईल, असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील विनापरवागी भोंग्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत आज (दि.११) चर्चा झाली. यावेळी राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर लाऊड स्पीकर लावण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले. तर राज्यात वर्षभर सुरू असणारे भोंगे बंद करण्यात यावे, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली.
येऊर हा राष्ट्रीय उद्यानाचा परिसर आहे. येथे कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. येथे मोठ्या आवाजात भोंगे सुरु असतात. एकेकाळी रस्त्यावर बिबटे दिसायचे. मात्र, आता मांजर ही दिसत नाही. यावर कारवाई केली पाहिजे. कलियुगातील सर्व प्रश्न मुख्यमंत्री यांनी सोडवले आहेत. हा ही कलियुगातील प्रश्न आहे. तो ही सोडवला पाहिजे, अशी मागणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
या चर्चांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, राज्यात विनापरवागी पुन्हा भोंगे लावण्याचा प्रयत्न केल्य़ास कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यातील 3 हजार 337 धार्मिक स्थळावरील भोंगे हटविण्यात आले आहेत. मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही. मुंबई पोलिसांनी 1608 भोंगे हटविले आहेत. यावेळी कोणताही धार्मिक तणाव झालेला नाही. मुंबईला भोंगे मुक्त करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. पुन्हा भोंगे लावले, तर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जो अधिकारी असेल, त्याला जबाबदार धरले जाणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जंगलात कोणतेही वाद्य वाजवता येत नाही. यासाठी वन विभाग आणि पोलिसांना सुचना देण्यात येतील. सर्वच पोलिस आयुक्त यांच्या कार्यालय अंतर्गत भरारी पथक स्थापन केले जाईल. दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर त्यांचे अभिनंदन केले.