Maharashtra Budget
महविकास आघाडीने अर्थसंकल्पावर टीका केली.  Maharashtra Budget
मुंबई

अर्थसंकल्पात थापांचा महापूर ; विरोधकांची टीका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: सरकारने आज मांडलेल्या अर्थसंकल्पात थापांचा महापूर आहे. त्यामुळे राज्यातील जनता सरकारच्या थापांवर सरकार विश्वास ठेवणार नाही. शिंदे सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.२८) राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यानंतर महाविकास आघाडीचे नेते विधीमंडळ परिसरातून आज (दि.२८ जून) माध्यमांशी बोलत होते.

अर्थसंकल्प हा लबाड घरचं आवतान; उद्धव ठाकरे

याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसरीकडे उदारपणातचा आव आणायचा असे हे सरकार करत आहे. निवडणुका आल्यावर अल्पसंख्याकांसाठी घोषणा का? निवडणुका तोंडावर आल्यावर सरकारने हिंदुत्त्व सोडलं का? असा सवाल देखील ठाकरे यांनी केला. या अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद आणि रोजगार वाढीसाठी उपाययोजना नसल्याचेही ते म्हणाले. अर्थसंकल्प हा लबाड घरचं आवतान आहे. त्यामुळे महायुतीने परत निवडून येण्याचे स्वप्न पाहून नये, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

बहिण-भाव असा भेद कशाला; ठाकरे

योजनांची अंमलबजावणी किती झाली याबाबात श्वेतपत्रिका जाहीर करा अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. लाडकी बहिणीसारखं भावांसाठीही काहीतरी आणा, भेद कशाला, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्त करण्याची मागणी या अर्थसंकल्पात पूर्ण केली नसल्याची टीका देखील ठाकरे यांनी केला आहे.

सोमवारपासून मोघम बजेटचे पोस्टमार्टम; नाना पटोले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प बोगस आहे. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ व्हावे ही मविआची मागणी होती, परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. सोमवारपासून मोघम बजेटचे पोस्टमार्टम केले जाईल. या बजेटमध्ये विभागिय कोणतीही तरतूद नाही. एमपीएससी. पोलिस भरतीत गोंधळाने राज्यांतील तरुणांत निराशा आहे.

चादर लगी फटने, खैरात लगी बटने; जयंत पाटलांचा टोला

सरकारच्या आज मांडण्यात आलेल्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी 'चादर लगी फटने, खैरात लगी बटने' असा टोला लगावला आहे. तसेच त्यांनी पुढे सरकारने बेजबाबदारपणे मांडलेले बजेट असल्याची टीका देखील केली आहे. हा संकल्प काही ठराविक लोकांसाठी आहे. लोकसभा पराभवाचे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याची टीका देखील यावेळी जयंत पाटील यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT