मुंबई : नमिता धुरी
वातावरणीय बदल आणि त्यामुळे यंदा लांबलेला पावसाळा याचा परिणाम म्हणून महामुंबई परिसरात दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरित पाणथळ पक्ष्यांचा मुक्कामही लांबला आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे स्थलांतरित पाणथळ पक्षी महामुंबईचा परिसर सोडून पुढच्या प्रवासाला निघतात; मात्र अद्याप ते येथेच थांबल्याने त्यांच्या प्रजननावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी ठाणे खाडी परिसरात ५० हजार ते १ लाखांपर्यंत स्थलांतरित पक्षी दिसतात. तसेच इतरही अनेक पाणथळ जागांवर हजारोंच्या संख्येने हे पक्षी हजेरी लावतात. पावसाळ्यापूर्वीच ते पुढच्या प्रवासाला निघतात आणि दुर्गम भागांमध्ये जाऊन प्रजनन करतात. साधारण १० ते १५ जूनच्या दरम्यान महामुंबई परिसरात मोसमी पाऊस सुरू होतो. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला. २३-२४ जूनला मुंबईकरांनी पहिला पाऊस अनुभवला. २१ जूनला संध्याकाळी उशिरापर्यंत सूर्यप्रकाश होता. या सगळ्या बदललेल्या वातावरणाचा परिणाम पक्षीजीवनावर होत आहे.
सीवूड्स येथील एनआरआय पाणथळ जागेत आजही छोटे रोहीत (फ्लेमिंगो) हजारोंच्या संख्येने दिसून येत आहेत. टी. एस. चाणक्य पाणथळ जागेतही विविध प्रकारच्या पाणथळ पक्ष्यांचे थवे दिसून येत आहेत. शेकडोंच्या संख्येने ते विश्रांती घेताना दिसत आहेत. यात छोटा चिखल्या, मोठा चिखल्या, बाकचोच तुतारी, रंगीत तुतारी या पक्ष्यांचा समावेश आहे. काही प्रमाणात उलटचोच तुतारी पक्षीही दिसत आहेत. काही पक्ष्यांच्या पायांत पक्षी शास्त्रज्ञांनी लावलेल्या रिंग्ज दिसून आल्या.
डॉ. राजू कसंबे यांनी टी. एस. चाणक्य येथे २१ जूनला भेट दिली. यावेळी त्यांना ७ हजार ५०० छोटे रोहीत आणि ५०-६० मोठे रोहीत पक्षी दिसले. इतर पाणथळ पक्ष्यांची संख्या अडीच हजारांपर्यंत होती.
पाणथळ पक्षी प्रजननेतर काळात विविध ठिकाणी स्थलांतर करतात आणि ऋतुमानाचा अंदाज घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाचे नियोजन करतात. हजारो किमीचा प्रवास करून ते प्रजननाच्या ठिकाणी पोहोचतात.
छोटा चिखल्या वगळता इतर सर्व पक्षी दुर्गम भागांमध्ये प्रजनन करतात. छायाचित्रांवरून असे लक्षात आले आहे की, छोटा चिखल्या सध्या त्याच्या प्रजननकालीन पिसाऱ्यामध्ये आहे. तसेच बाकचोच तुतारी आणि उलटचोच तुतारी हे पक्षी त्यांच्या प्रजननेतर पिसाऱ्यांत आहेत.
पक्षी निरीक्षकांचे निरीक्षण
नवी मुंबई येथील पक्षी निरीक्षक डॉ. मुरली पोडुवाल यांनी टी. एस. चाणक्य पाणथळ जागेत तीन रडी टर्नस्टोन्स पक्षी पाहिले. मुंबई बर्डवॉचर्स क्लबचे आदेश शिवकर यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही पाणथळ पक्ष्यांनी जास्त काळ मुक्काम केल्याची उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. मात्र यावर्षी जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणथळ पक्षी दिसणे, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.
मागील नोंदी पाहता मुंबई परिसरात (आणि भारतातील इतर ठिकाणी) जून आणि जुलैमध्येही या प्रजातीचे काही पक्षी आढळल्याची नोंद आहे, परंतु त्यांना इतक्या मोठ्या संख्येने या काळात पाहणे ही एक आश्चर्यकारक घटना आहे. यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कदाचित स्थलांतरित पक्ष्यांचे हे वर्तन आपल्याला हवामान बदल आणि त्यांच्या येण्या-जाण्याच्या तारखांवर होणाऱ्या त्याच्या परिणामांबद्दल सांगत असावे. मानवी कृतींमुळे आपल्या स्थलांतरित पक्ष्यांवर काय परिणाम होत आहे हे केवळ दीर्घकालीन नोंदींवरूनच कळेल.डॉ. राजू कसंबे, पक्षीशास्त्रज्ञ