Delay in Goregaon-Mulund Link Road work exposed
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कामातील दिरंगाई उघड Pudhari Photo
मुंबई

वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या बोगद्याचे भूमिपूजन !

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

कोणत्याही प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरात काम सुरू होणे अपेक्षित असते. मात्र गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील बोगद्याची निविदा प्रक्रिया जुलै 2023 मध्ये पूर्ण होऊन तब्बल वर्षभरानंतर या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येत आहे. त्यामुळे या लिंक रोडच्या कामातील दिरंगाई उघड झाली अजून यामुळे पालिका प्रशासनाचे पितळेही उघडे पडले आहे.

गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर खोदण्यात येणाऱ्या बोगद्याची निविदा प्रक्रिया जुलै २०२३ पूर्ण झाली. या बोगद्यासाठी तब्बल ६ हजार ३०१ कोटी रुपये खर्च येणार असून जे.कुमार-एनसीसी जेव्ही या कंत्राटयाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या बोगद्याच्या कामाची सुरुवात ऑक्टोबर २०२३ मध्येच होणे अपेक्षित होते. हे काम सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र पालिकेने बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवार १३ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवल्यामुळे हे काम सुरू झाले नसणार, असे गृहीत धरले तरी, काम सुरू होण्यास एवढा विलंब का ? असा प्रश्न मुंबईकरांना पडल्याशिवाय राहणार नाही.

निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी लोटला तरी, कंत्राटदाराने काम का सुरू केले नाही. कंत्राटदारावर कोणती कारवाई केली, याची उत्तरही मुंबई महापालिका प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. दरम्यान बोगद्याचे खनन काम सुरू झाले असून केवळ राज्य सरकारच्या दबावापोटी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या राजकीय खेळात मुंबई महापालिका प्रशासन फसले आहे. विविध प्रक्रिया पूर्ण होऊन बोगद्याच्या कामाला उशीर का झाला, याबाबत कोर्टात कोणी याचिका दाखल केली तर, पालिका प्रशासनाची मोठी पंचायत होऊ शकते.

बोगद्यांची ठळक वैशिष्ट्ये

  • बोगद्यांची लांबी- प्रत्‍येकी 4.7 किलोमीटर

  • 13 मीटर अंतर्गत व्‍यास

  • कमाल वेग 80 किलोमीटर प्रति तास

  • तीन मार्गिका आणि पदपथ तसेच विविध यंत्रणांच्या वाहिन्या

  • बोगद्यांची जमिनीखाली खोली 20 ते 220 मीटर.

  • समांतर बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन मार्गिका

  • दोन्ही बोगद्यांमधील अंतर 15 मीटर

  • दोन्ही बोगदे छेद मार्गांद्वारे (क्रॉस पॅसेल) प्रत्येक 300 मीटरवर एकमेकांशी जोडले जातील

  • अग्निशमन यंत्रणा आणि अग्निरोधक यंत्रणा आणि सीसीटीव्ही यंत्रणा

आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया !

फिल्म सिटी ते खिंडीपाडा जंक्शन या टप्प्या दरम्यान नॅशनल पार्कचा भाग असल्याने, हा टप्पा जोडण्यासाठी जुळ्या आणि पूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या भूमिगत बोगदा खोदण्यात येणार आहे. बोगदा बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागवण्यात आल्या होत्या. यात जेकुमार-एनसीसी जेव्ही, एल ऍण्ड टी आणि ऍफकॉन्स या तीन कंपन्या अंतिम स्पर्धेत होत्या. यातील जेकुमार-एनसीसी जेव्ही यांनी सर्वात कमी किंमतीची बोली लावल्यामुळे त्यांना कंत्राट देण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT