मुंबई: शारीरिक मर्यादा या कधीही तुमच्या प्रगतीतील अडथळा ठरू शकत नाहीत. उलट माझ्या दिव्यांगपणानेच मला जगण्याचे खरे ध्येय आणि नवी ऊर्जा दिली, असे प्रेरणादायी प्रतिपादन भारताच्या पहिल्या महिला पॅरालिम्पिक पदकविजेत्या आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. दीपा मलिक यांनी येथे केले.
"लकवा आल्याने माझे शरीर थांबले; पण खेळाने माझे हात थांबवले नाहीत. त्यामुळे शिकत राहाल, तरच जिंकत राहाल," असा मोलाचा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विचारांना सभागृहाने जोरदार टाळ्यांनी दाद दिली.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात सुरू असलेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’ मधील ‘द करेज टू राइज’ या विशेष सत्रात त्या शुक्रवारी बोलत होत्या. आपल्या ‘ब्रिंग इट ऑन’ या पुस्तकाच्या आणि जीवनप्रवासाच्या निमित्ताने त्यांनी तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दीपा मलिक पुढे म्हणाल्या की, आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरून न जाता त्यांचा सकारात्मकतेने स्वीकार करायला हवा. जेव्हा आपण स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन आपल्यातील क्षमता ओळखतो, तेव्हाच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संकटे आणि आव्हाने येतातच. मात्र त्या आव्हानांना घाबरून मागे हटण्यापेक्षा 'ब्रिंग इट ऑन' (येऊ द्या) अशी सकारात्मक आणि जिद्दीची वृत्ती बाळगणे महत्त्वाचे असते. अपयश हा यशाच्या प्रवासातील केवळ एक टप्पा आहे, तो अंतिम थांबा नाही. जेव्हा आपण कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करतो, तेव्हाच आपल्यातील खऱ्या क्षमतेची ओळख आपल्याला होते.
तरुण पिढीला संदेश देताना त्या म्हणाल्या, आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांवर मानसिक दडपण वाढत आहे. अशा वेळी वाचन, आत्मपरीक्षण आणि स्वतःवरील विश्वास तुम्हाला योग्य दिशा देऊ शकतो. पुस्तके केवळ माहिती देत नाहीत.
तर ती संकटात लढण्याचे बळ आणि नवा दृष्टिकोन देतात. त्यामुळे तरुणांनी केवळ समाजमाध्यमांपुरते मर्यादित न राहता, दर्जेदार साहित्याचे वाचन करून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यानिमित्ताने दिला.