मुंबई : पुढारी वृत्तसेवा
आरोग्यवर्धक कॅप्सूल म्हणून विक्री, होणाऱ्या 'ऊर्जा अर्बप्रो' या उत्पादनामध्ये लैंगिक दुर्बलतेवरील उपचारासाठी वापरले जाणारे टाडालाफिल हे औषध आढळले आहे. विशेष म्हणजे, उत्पादनाच्या घटकांच्या यादीत या औषधाचा उल्लेख नव्हता. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत प्रत्येक कॅप्सूलमध्ये ८.६७ मिलीग्रॅम टाडालाफिल आढळल्याने हे उत्पादन बनावट घोषित करण्यात आले आहे.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या सप्टेंबर २०२६ मधील गुणवत्ता अहवालानुसार, देशभरातील ३३० औषधांचे नमुने निकृष्ट दर्जाचे किंवा बनावट आढळले. त्यामध्ये महाराष्ट्रातील १८ नमुन्यांचा समावेश आहे.
'ऊर्जा अर्बप्रो'च्या संबंधित तुकडीचा क्रमांक युआरजीए ०२ असून, उत्पादन मे २०२६ मध्ये राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील अर्बोफोर्ट कंपनीने केले होते. त्याची अंतिम वापराची मुदत एप्रिल २०२९ आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० मधील कलम ३३-ईईए (डी) अंतर्गत हे उत्पादन बनावट घोषित करण्यात आले.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये उत्पादित 'गोरी' सौंदर्यप्रसाधनांच्या दोन नमुन्यांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा प्रचंड अधिक पारा आढळला. पहिल्या नमुन्यात ८९,७३३.०४ पीपीएम, तर दुसऱ्यामध्ये ४७,४७७.५३ पीपीएम पारा आढळला.
याशिवाय हायड्रोक्विनोन आणि एका नमुन्यात मोमेटासोन फ्युरोएटही आढळले. रक्तदाबावरील 'ओसारस्मार्ट ४० ट्रायो'मध्ये औषधी घटकाचे प्रमाण ५१.८० टक्के, 'असेलिओ-प्लस'मध्ये ३२.३३ टक्के, तर फॅमोटिडीन ४० मिलीग्रॅम गोळ्यांमध्ये ७८.९८ टक्के आढळले. प्रतिजैविके, दम्यावरील औषधे, अस्पिरिन, जीवनसत्त्व 'क'च्या गोळ्या आणि जंतुनाशक द्रावणांचे नमुनेही गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले. ही निष्कर्षे तपासलेल्या विशिष्ट तुकड्यांपुरती मर्यादित आहेत. नागरिकांनी औषधांबाबत शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि स्वतःहून उपचार बंद करू नयेत.
टाडालाफिल हे रक्तप्रवाह सुधारण्यासाठी वापरले जाणारे औषध असून, त्याच्या सेवनामुळे डोकेदुखी, चक्कर, अपचन आणि पाठदुखी असे दुष्परिणाम होऊ शकतात. हृदयविकारासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रेट गटातील औषधांसोबत घेतल्यास रक्तदाब धोकादायकरीत्या कमी होऊ शकतो.