मालाड : दहिसर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 व 3 वर नव्याने बसवण्यात आलेल्या छतावर वीज दिवे न लावल्याने प्रवाशांना अंधारात गाड्या पकडण्याची वेळ येत होती. याबाबत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने तक्रार नोंदवत लाईट कधी लागणार?, असा थेट सवाल उपस्थित केला होता. याबाबत 26 नोव्हेंबरच्या दैनिक पुढारीत बातमी प्रसिध्द होताच रेल्वे प्रशासन सरसावले आणि फलाट दिव्यांनी जगमगले.
पश्चिम रेल्वेच्या दहिसर स्थानकाच्या उत्तर दिशेकडील स्टेशन मॅनेजर कार्यालयापासून शेवटच्या पुलापर्यंत अंदाजे 100 ते 150 मीटर परिसरात छप्पर बसवण्याचे काम दीड वर्षांपासून रखडले होते. प्रवासी महासंघाच्या पाठपुराव्यानंतर जून महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले.
मात्र, सहा महिने उलटूनही या छतावर एकही विजेचा दिवा बसवलेला नव्हता. मात्र याबाबत दैनिक पुढारीत 26 रोजी बातमी प्रसिध्द होताच प्रशासन सरसावले आणि जे काम सहा महिने उलटले तरी झाले नव्हते ते काम अवघ्या एका दिवसात झाल्याने फलाट क्रमांक 2 वरून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलच्या शेवटच्या चार डब्यांतील प्रवासी तसेच फलाट क्र. 3 वरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या पहिल्या चार डब्यांतील (महिला डबासह) प्रवाशांच्या अडचणी कमी झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने दैनिक पुढारीचे आभार मानले आहेत.