

बोईसर ःसरावलीतील ‘गो ग्रीन’ उद्योगाने पर्यावरणीय नियमांचा भंग केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, हा उद्योग कोलवडे येथे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होताच ग्रामस्थांनी तीव्र विरोधाचा झेंडा उभारला आहे. प्रशासन, उद्योग आणि ग्रामस्थ यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरावली येथील गो ग्रीन इको टेक सोल्यूशन प्रा. लि. या उद्योगाने केंद्रीय पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींचे पालन न केल्याचे तपासणीत उघड झाल्यानंतर प्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस यांनी 17 ऑक्टोबर रोजी उद्योगाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संमती अटींचे उल्लंघन, धोकादायक घनकचऱ्याच्या प्रक्रियेत अनियमितता, अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव,आणि कचरा पुनर्प्रक्रिया यंत्रणेत आवश्यक सुधारणा न केल्याबद्दल मंडळाने गंभीर आक्षेप घेतले आहेत. उद्योगाला मिळालेल्या 31 सप्टेंबर 2023 च्या संमतीतील अनेक अटींचे पालन होत नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
सरावलीमधील उद्योगाचे बांधकाम जिल्हा प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जमिनीच्या बिनशेती आदेशांतही अनियमितता असल्याचे दिसून आले असून महसूल आणि पर्यावरण विभागाने मिळून या उद्योगाला बेकायदेशीररीत्या परवानगी दिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या सर्व घडामोडींमुळे सरावली,कोलवडे परिसरातील पर्यावरणीय प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
घरगुती आणि औद्योगिक दोन्ही प्रकारच्या घनकचरा केंद्रांना ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे. प्रशासनाचा आडमुठेपणा सहन केला जाणार नाही.
कुंजल संखे, सरपंच कोलवडे