Dahisar Metro station issue Pudhari
मुंबई

Dahisar Metro station issue:दहिसर मेट्रो स्टेशनने गिळला रस्ता; 30 फुटी रस्ता झाला 16 फुटी

दहिसर पूर्वेत वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

सुनील गायकवाड

कांदिवली: मेट्रो स्थानकामुळे दहिसरकरांची उलट गैरसोयच झाली आहे. पूर्वेतील राजनगर समोरून जाणाऱ्या मुख्य मार्गावरच मेट्रोची शिडी उतरवण्यात आली आहे. त्यामुळे 30 फुटी रस्ता 16 फुटी झाला असून वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पदपथ गायब झाल्याने चालायचे कुठून असा प्रश्न पादचाऱ्यांना पडला आहे.

दहिसर पूर्वेला मेट्रो स्टेशन उभारण्यात आले आहे. मेट्रो मार्गिका 9 (मीरा भाईंदर )आणि मार्गिका 7 (दहिसर ) यांचे हे जंक्शन स्टेशन असून ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. मात्र या स्थानकामुळे घरट पाडा, संत मीराबाई रोडवर उभारलेल्या व्हर्टीकल स्टेअरकेसने रस्त्याच्या एका बाजूच्या फुटपाथचा संपूर्ण भाग बंद झाला आहे.

पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथच शिल्लक राहिलेला नाही. जिन्याचा काही भाग रस्त्यावरच उतरवण्यात आला आहे. रस्त्याचे दुभाजकही मेट्रो बांधकामात गायब झाले आहेत.

हा वर्दळीचा मार्ग आहे. मेट्रो स्थानक होण्यापूर्वी तीन वाहने सहज ये-जा करत होती. आता दोन वाहनांनाही मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. मेट्रो व्यवस्थापानाने केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

बांधकामे वाचवण्यासाठी आराखड्यात बदल

शासन निर्णयानुसार ( दि.25/8/22) लिफ्ट आणि एक्सीलरेटरकरिता सोसायटीची जागा भूसंपादन करण्यात येणार होती. परंतु नंतर अचानक जागा बदल करण्यात आला. येथील बांधकामे वाचविण्यासाठी मेट्रोने रस्त्यावरच स्थानकाचा काही भाग उभारला असून वर्दळीचा रस्ता अरुंद झाल्याचा आरोप होत आहे.

मेट्रो व्यवस्थापनाने तातडीने लक्ष घालून याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

स्थानिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. शासनाचे निर्णय वेगळे व प्रत्यक्षात काम वेगळे करण्यात आले आहे, याचे पुरावे आमच्याकडे आहेत. बांधकाम व्यावसायिकांना मदत करण्यासाठी शासनाने निर्णयात बदल करून मेट्रो स्थानकाचे चुकीच्या पद्धतीने काम केले.
- राजेंद्र भगत, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT