मुंबई: दहिसर (पश्चिम) येथील एका भूखंडाच्या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात आरोपी मुकेश चुन्नीलाल भाटिया यांची फौजदारी रिव्हिजन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीला दोषमुक्ती मिळणार नाही, असा निर्वाळा देत न्यायमूर्ती एम. एम. साठये यांनी हा निकाल दिला.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, १८ जुलै २०२१ रोजी पहाटे ३ वाजता फिर्यादी त्यांचे वडील, भागीदार, दोन मुले आणि वकील यांनी दहिसर येथील वादग्रस्त भूखंडावर १५ ते २० लोकांनी येऊन लावलेला बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी विरोध केल्यानंतर त्यांच्यावर तलवार, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला संघटित गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाच्या इशाऱ्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात कांदिवली येथील रहिवासी असलेल्या मुकेश भाटिया याला आरोपी करण्यात आले होते.
विशेष ‘मोका’ न्यायालयाने आरोपी भाटिया याला ‘मोका’ कायद्याच्या कलमांमधून दोषमुक्त केले होते; परंतु भारतीय दंड संहितेच्या अन्य गंभीर कलमांखालील गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यास नकार दिला होता.
या नकाराविरोधात भाटियाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आरोपीविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू झाला असून, दोषारोप निश्चिती झाली असल्याने, आता या टप्प्यावर त्याला दोषमुक्त करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि याचिका फेटाळली.