Dadar White Stripe Controversy Pudhari
मुंबई

Dadar White Stripe Controversy: दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद उफाळला

आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत: जैन मुनी नीलेशचंद्र यांनी मनसेला डिवचले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जैन धर्मियांकडून दादरच्या गोखले रोडवर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून शनिवारी मोठा वाद निर्माण झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या पांढऱ्या पट्ट्यांवर जोरदार आक्षेप घेतला.

दुपारी ३ पर्यंत पांढरी पट्टी काढा, नाहीतर मनसे स्टाइलने उत्तर देऊ,असा थेट इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे दादर परिसरात वातावरण तापले होते. अखेर वाद अधिक चिघळू नये म्हणून महापालिकेने तत्काळ तिथे जाऊन या पांढऱ्या पट्ट्या करड्या रंगाने हटवल्या आहेत.

दरम्यान, पट्ट्यांच्या विरोधानंतर जैन मुनी नीलेशचंद्र यांनी मनसेला डिवचले आहे. जैनांनी बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आल्यावर तुम्हाला उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा त्यांनी मनसेला दिला. त्यामुळे आता हा वाद अधिकच पेटणार असल्याची चर्चा दादर, माहीम परिसरात आहे.

घाटकोपर विद्याविहार येथे जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी अशाच पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. त्यानंतर शनिवारी दादरच्या गोखले रोडवर या पांढऱ्या पट्ट्या मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ आल्यानंतर हा वाद उफाळला. मनसेने आक्षेप घेत हा सांस्कृतिक दहशतवाद आहे, अशी कडवी भूमिका मांडली.

अशाप्रकारे जैनांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. आम्ही गणपती उत्सवासाठी रीतसर परवानगी घेतो. मग या पांढऱ्या पट्ट्यांसाठी जैनांनी परवानगी घेतली आहे का, असा संतप्त सवाल त्यानी उपस्थित केला.

दुपारपर्यंत पट्टी काढा नाहीतर मनसे स्टाइलने उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिल्यामुळे दादरमध्ये जैन विरुद्ध मनसे असे वातावरण तापले होते. संध्याकाळपर्यत दादर परिसरात शेकडो मनसे कार्यकर्त्यानी गर्दी केली होती. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून मुंबई महापालिकेने तत्काळ तिथे जाऊन या पांढऱ्या पट्ट्या करडा रंग लावून हटवल्या. मात्र मनसेचा वाढता विरोध पाहता जैन मुनी निलेशचंद्र यांनी मनसेला इशारा दिला आहे.

आता मी डहाणूला गेेलो होतो. तिथे लव्ह जिहाद झाले आहे. संदीप देशपांडे, तिथे तुम्ही कधी जाणार मुस्लिमांचे तोंड काळे करण्यासाठी, असा बोचरा सवाल जैन मुनी नीलेशचंद्र यांनी देशपांडे यांना विचारला आहे. जैन धर्मगुरू यांना चालण्यासाठी त्या पट्ट्या मारल्या आहेत. तो काही दहशतवाद नाही.

अशा पद्धतीने जातीयवाद करतात म्हणून मनसेचे आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येत नाहीत, असेही निलेशचंद्र मुनी यांनी देशपांडे यांना सुनावले आहे. येत्या काळात मनसेला योग्य वेळी उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.

त्यामुळे आज रविवारी मनसे नेते संदीप देशपांडे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. येथील वॉर्डात उचापती वाढल्या आहेत. या उचापती करणारा 'पती' शोधा असे त्या म्हणाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT