मुंबई: एल्फिन्स्टन रेल्वे पूल पाडल्यापासून दादर पश्चिमेतील भवानी शंकर रोड व एस.के. बोले मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे स्थानिकांसह वाहनचालक त्रस्त आहेत.
ही कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल वाहतूक विभागाने केले आहेत. भवानी शंकर रोड एकेरी मार्ग (वन वे) करण्यात आला असल्याचे पोलीस उपआयुक्त यांनी गुरुवारी घोषीत केल आहे.
ही वाहतूक व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात असून 24 ऑगस्टपर्यंत हा बदल असणार आहे. मात्र या बदलामुळे या दोन मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असली तरी गोखले रोड, कोतवाल गार्डन, पोर्तुगीज चर्च, काकासाहेब गाडगीळ, सेनापती बापट मार्गावर ताण वाढणार आहे.
या नवीन बदलानुसार हनुमान मंदिराकडून गोपीनाथ चव्हाण चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांना गोपीनाथ चव्हाण चौकातून हनुमान मंदिर कबुतरखाना, भवानी शंकर रोड, पेंढारकर चौक, जनकदेव रोड, भवानी मंदिर, नवेद वळण या मार्गी पुढील प्रवास करावा लागणार आहे.
बोले रोडवरही वाहतूक दिशाबदल
एस. के. बोले रोडवरही वाहतूक दिशाबदल करण्यात आले आहेत. पोर्तुगीज चर्चकडून हनुमान मंदिराकडे येण्यासाठी हा रस्ता एकेरी राहणार आहे. वाहनांचा हनुमान मंदिराकडून पोर्तुगीज चर्चकडे जाता येणार नाही.
त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून हनुमान मंदिर, भवानी शंकर रोड, कबुतरखाना, टिळक पूल प्रवेश, आगाशे पथ, बाह्यवळण गोपीनाथ चव्हाण चौकाला वळसा, भवानी शंकर रोड असे जाता येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक पोलीस सूचनांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते अशा सूचना वाहतूक पोलीस उप आयुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी दिल्या आहेत.
वाहतूक बदलाचा परिणाम काय?
या वाहतूक बदलामुळे गोखले रोड, कोतवाल गार्डन, पोर्तुगीज चर्च, काकासाहेब गाडगीळ, सेनापती बापट मार्गावर वाहतूकीचा ताण वाढणार आहे.
गोपीनाथ चव्हाण चौकातून पुढे हनुमान मंदिर किंवा प्लाझा येथे जाण्यासाठी वाहनचालकांना गोखले रोडवरून पोर्तुगीज चर्च करत पुढे जावे लागणार आहे. अशावेळी मोकळा मार्ग म्हणून शिवसेना भवन किंवा कोहिनूर स्क्वेअरवरून टिळक ब्रिजवर येताना पुन्हा वाहतूक कोंडी होणार आहे.
हनुमान मंदिर येथे डावे वळून घेऊन कोतवाल गार्डनवरून पुन्हा वळसा घेऊन येताना दादरचे अनेक बाजार रस्ते कोंडीत सापडणार आहे. त्याचा फटका टिळक ब्रिजवरून वरळी किंवा पुढे जाणाऱ्या वाहनांना बसणार आहे.
बेस्ट बस मार्गातही बदल
56, 88, 110, 151, 356, 385, 165 या बेस्ट बसचे मार्गही बदलले जाणार आहे. त्यामुळे सेनापती बापट मार्ग, बाबुराव परुळेकर मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, डिसिलवा रोड, जावळे रोड, घाणेकर मार्ग एकनाथ ठाकूर चौक वाहतूक कोंडीत सापडणार आहेत.