मुंबई : भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे विधानभवनात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री भाई गिरकर आदी उपस्थित होते.  pudhari photo
मुंबई

Dadar Railway Station Renaming : दादर स्थानक नामकरण प्रक्रिया अधिवेशनात

‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्त्‍वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक प्रक्रियेची पूर्तता करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुधवारी घेण्यात आला. विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौद्ध भिख्खू संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीत कुठे अडचण आहे, याची तपासणी करून पुढील पाच ते सात दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.

महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य व पावित्र्य कायम राखणे आवश्यक असून, या दिवशी उत्सवी स्वरूपाचे आयोजन टाळण्यात यावे. हा दिवस दुःखाचा असल्याने उत्सवी स्वरूपाच्या कार्यक्रमाऐवजी अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट अथवा त्यांच्या विचारांशी सुसंगत अन्य उपक्रम आयोजित करता येतील का, याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तर, चैत्यभूमीवर येणार्‍या अनुयायांना सर्व सुविधा देणार, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात यावे, असे सांगितले.

इंदू मिल स्मारकासाठी पुढील आठवड्यात बैठक

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून, उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT