मुंबई : वरळी ते शिवडी या उन्नत मार्गासाठी दुमजली पूल बांधण्यात येत असल्याने प्रभादेवी पुलावर शुक्रवारी रात्री हातोडा मारण्यात आला. त्यानंतर हा मार्ग बंद झाल्याने या परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. दादरला पूर्व-पश्चिम जोडणारा टिळक पूल आणि लोअर परळचा पूल हे पर्यायी मार्ग असले तरी वाहतुकीची समस्या सुटणार नाही. दोन दिवस सुट्टीचे असल्याने मोठा ताण जाणवला नाही. तथापि, सोमवारी वाहनधारकांसह वाहतूक पोलिसांची कसोटी लागणार आहे. (Latest mumbai News)
शनिवार आणि रविवारी सरकारी आस्थापनांसह अनेक खासगी संस्था बंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली नसली तरी टिळक पूल आणि लोअर परळचा पूल नेहमीपेक्षा चौपट वाहनांनी भरून गेला होता. त्यामुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. सोमवारी कामकाजाचा दिवस असल्याने दादर परिसरात अभूतपूर्व कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच दादरमध्ये अनेक ठिकाणी पार्किंग उपलब्ध नसल्याने कोंडीत आणखी भर पडू शकते.
वाहतूक पोलिसांनी प्रभादेवी पुलाला पर्यायी मार्ग सुचवले असले तरी वाहतूक कोंडीमध्ये नागरिकांना अडकून पडावे लागू शकते. परळच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात सरकारी तसेच मोठी खासगी रुग्णालये आहेत. सरकारी आस्थापनादेखील याच भागात आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी प्रभादेवी पूल अत्यंत सोयीस्कर होता. फारशी कोंडी न होता दोन्ही बाजूंची रहदारी सुरळीत सुरू होती. मात्र, हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना मोठा वळसा मारावा लागणार आहे. टिळक पुलाबरोबरच, करी रोड पूल आणि चिंचपोकळी पुलावर वाहनांची मोठी गर्दी होऊ शकते. कितीही नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला तरी वाहतूक कोंडी नागरिकांना सहन करावी लागणार आहे.
परळ विभाग हा मुंबईतील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वाधिक घनतेचा परिसर मानला जातो. या भागात दर किलोमीटरमागे 35 हजारांहून अधिक नागरिक राहतात, तर लोअर परळमध्ये ही संख्या 41 हजारांहून अधिक आहे. या भागात होत असणार्या टॉवरमुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच आहे. त्यामानाने रस्त्यांची लांबी आणि रुंदी वाढलेली नाही. त्यातच प्रभादेवी पूल बंद झाल्याने या परिसरात रहदारी नियंत्रित करणे अवघड होणार आहे.