वाशी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले, तरच या विमानतळावरून विमानांचे उड्डाण होईल, अन्यथा नाही, असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी रविवारी वाशी येथे काढलेल्या ‘दि.बा. मानवंदना कार रॅली’तून केंद्र सरकारला दिला. शेकडो प्रकल्पग्रस्त आपल्या वाहनांसह या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. (Latest Mumbai News)
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी, सागरी भूमिपुत्र संघटनांच्या वतीने रविवारी ‘दि.बा. मानवंदना कार रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. भिवंडी (माणकोली) ते ठाणे ते नवी मुंबई, लोकनेते दि.बा. पाटील विमानतळ, चिंचपाडा ओवळा मार्गे जासईपर्यंत ही रॅली काढण्यात आली. विमानतळाला लोकनेते दि. बां.ंचे नाव देण्यात यावे अशी सर्व राजकीय पक्ष आणि प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ही रॅली काढल्याचे खा. म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार आहे, मात्र अद्याप विमानतळाला दि.बांचे नाव केंद्र सरकारने घोषित केलेले नाही. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही, तर भविष्यात अधिक आक्रमकपणे आंदोलनही करू. -
प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)