मुंबई : दादर-मुलुंड लोकल प्रवासादरम्यान अश्लील चाळे करून एका महिलेचा अज्ञात वयोवृद्धाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन कुर्ला रेल्वे पोलिसांनी आरोपी वयोवृद्धाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी शोध सुरू आहे.
तक्रारदार महिला ही मंगळवारी दादर रेल्वे स्थानकात आली होती. दुपारी तिने ठाण्याला जाणारी लोकल पकडली. लोकल प्रवासादरम्यान ती मोबाईल पाहत होती. ही लोकल मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना तिने समोर पाहिले असता अपंग डब्यातून प्रवास करत असलेला 70 ते 75 वयोगटातील वयोवृद्ध आरोपी तिच्याकडे अश्लील नजरेने पाहत होता.
तिच्याकडे पाहून त्याने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे रेल्वे स्थानक आल्यानंतर ती अपंगाच्या डब्याजवळ गेली. तोपर्यंत आरोपी वयोवृद्ध तेथून पसार झाला होता. घडलेला प्रकार तिने ठाणे रेल्वे पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास नंतर कुर्ला रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आला. गुन्हा दाखल होताच रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटवून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.