Dada Bhuse File Photo
मुंबई

Dada Bhuse : दोन वर्षांत 255 मराठी शाळा बंद पडल्या

शिक्षणमंत्री भुसे यांची कबुली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांत घालण्याचा पालकांचा कल वाढत असल्याने गेल्या दोन वर्षांत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील 255 मराठी शाळा बंद झाल्याची कबुली खुद्द शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

मराठी शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला नाही. तसेच शासनाचे कोणतेही धोरण नाही, असेही शिक्षणमंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी, विक्रम काळे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यात 2 हजार मराठी शाळा अडचणीत आल्या असून 620 शाळा बंद होणार असल्यामुळे 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची स्थिती निर्माण झाली झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून 70 गावांत ‌‘ना शाळा ना पाटी-पेन्सिल‌’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठी शाळा वाचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक, विद्यार्थी व संस्थाचालकांनी लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले होते.

प्रश्नाच्या लेखी उत्तरात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी, दोन हजार मराठी शाळा अडचणीत तसेच 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची माहिती फेटाळली. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांत पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत असल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या भागांत 255 मराठी शाळा बंद पडल्याची कबुली शिक्षणमंत्र्यांनी दिली.

  • मराठी शाळांचा पट वाढविणे व मराठी शाळा टिकवणे यासाठी शाळा प्रवेशोत्सव, पहली ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके/ मोफत गणवेश/ पायमोजे बूट, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना आदी उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT