मुंबई : सीएसएमटी - कुर्ला पाचव्या व सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी, जागा रिकामी झाली नाही तर या प्रकल्पाचे काम रखडेल अशी खंत व्यक्त केल्यानंतर हायकोर्टात धाव घेतलेल्या धारावी रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी जागा रिकामी करत एसआरएच्या घरात जाण्याची हमी दिली. त्यामुळे प्रकल्पातील मोठी अडचण दूर झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान रेल्वेची पाचवी व सहावी मार्गिका टाकली जाणार आहे. 2008 साली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. मात्र अनेक अडथळे आल्याने हा प्रकल्प रखडला आहे.
सायन येथील काही जागा प्रकल्पासाठी आवश्यक असून ती जागा ताब्यात मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सायन रेल्वे स्थानक ते सायन रुग्णालय उड्डाणपुलापर्यंतची जागा रेल्वे हस्तगत करणार असून या प्रकल्पात 627 रहिवासी बाधित होणार आहेत. योग्य पद्धतीने पुनर्वसन न करता घरे ताब्यात घेतली जात असल्याने धारावी रेल्वे प्रकल्पग्रस्त या रहिवाशांच्या संघटनेने हायकोर्टात धाव घेत ॲॅड. मनोहर मांडवकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली.
यावेळी याचीकाकर्त्यांच्यावतीने युक्तिवाद करताना योग्य प्रकारे पुनर्वसन न करताच बळजबरीने घरे रिकामी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात तर रेल्वेच्यावतीने ॲड.नारायण बुबना यांनी युक्तिवाद करत याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळून लावला. एप्रिल महिन्यात पझेशन लेटर रहिवाशांना देण्यात आले असून येत्या आठवडाभरात काही रहिवाशी घरांचा ताबा घेणार असल्याचे मा. न्यायालयाला सांगितले.
त्यावर न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी याचिकाकर्त्यांना आपल्या भूमिकेमुळे हा प्रकल्प रखडले असे सांगितले. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी पुनर्वसनाच्या घरात जाण्यास होकार दर्शवत पुनर्वसन करण्यात येणाऱ्या घरात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
एमयुटीपी 2 अंतर्गंत 2008 मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे मुंबई सेंट्रल ते बारिवली सहावी मार्गिका, सीएसएमटी - कुर्ला पाचव्या व सहाव्या मार्गिका, ठाणे- दिवा पाचवी व साहावी मार्गिका या तीन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. यातील ठाणे- दिवा प्रकल्प पूर्ण होत प्रवाशांच्या सेवेत आला आहे. मात्र सीएसएमटी - कुर्ला पाचव्या व सहाव्या मार्गिका रखडली आहे. आता हा मोठा अडथळा दूर झाल्याने ही मार्गिकाही लवकरच पूर्ण होणार आहे.