Girl Missing Case Pudhari
मुंबई

Girls Missing Cases: महाराष्ट्रात बेपत्ता मुलींचे प्रमाण वाढले! टक्केवारी 57.1 वर, क्राय संस्थेच्या अहवालात माहिती उघड

केवळ आपल्या मुलींचेच नव्हे तर मुलांचेही संरक्षण करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संघटनांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात बेपत्ता होणाऱ्या मुलांमध्ये मुलींची टक्केवारी अधिक असल्याचे वास्तव बालकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या चाइल्ड राइट्स अँड यू ( क्राय )च्या अहवालातून पुढे आले आहे. सोमवारी क्राय संस्थेच्या पश्चिम विभागाच्या संचालक क्रिएन रबाडी यांनी ही माहिती दिली.

त्या म्हणाल्या, मागील काही वर्षांपासून मुलींच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. परंतु दुर्दैवाने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आकडेवारीत वेगळीच कहाणी आहे. केवळ आपल्या मुलींचेच नव्हे तर मुलांचेही संरक्षण करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संघटनांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात 2024 मध्ये बेपत्ता मुलांपैकी 2,057 मुली आणि 1,438 मुलांचा समावेश होता. तसेच बेपत्ता बालकांच्या व्यापक गटामध्ये 3,165 मुली, 2372 मुले आणि 3 तृतीयपंथी बालके होती. याचाच अर्थ राज्यात बेपत्ता मुलांपैकी मुलींची टक्केवारी 57.1 टक्के अधिक असल्याचे पुढे आले आहे.

देशभरात दररोज 514 हून अधिक गुन्हे

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2014 मध्ये देशभरात बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांची 89 हजार 423 प्रकरणे होती. त्यात प्रचंड वाढ होऊन 2024 मध्ये एकूण 1 लाख 87 हजार 702 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याचा अर्थ असा आहे की, देशभरात दररोज मुलांविरुद्ध सरासरी 514 हून अधिक गुन्हे घडतात. दर तासाला 21 हून अधिक गुन्हे आणि दर 3 मिनिटांनी जवळजवळ एक गुन्हा घडतो आहे, असे आकडेवारी सांगते.

बाल गुन्ह्यांत महाराष्ट्र प्रमुख केंद्र

राज्यात 2024 मध्ये बेपत्ता बालकांसंबंधी 24 हजार 171 गुन्हे दाखल केले गेले. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात त्याचे प्रमाण 66.9 होते. बालकांचे अपहरण आणि अपहरणाशी संबंधित गुन्ह्यांसाठी महाराष्ट्र हे एक प्रमुख केंद्र असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची 12,994 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी संपूर्ण देशात जास्त आहे.

बेपत्ता बालकांमध्ये 6.2 टक्के वाढ

देशात बेपत्ता बालकांची संख्या 2023 मध्ये 1 लाख 38 हजार 609 होती. गेल्या वर्षी 2024 मध्ये हीच संख्या 1 लाख 47 हजार 175 पर्यंत वाढली आहे. याचा अर्थ ही वाढ 6.2 टक्के इतकी आहे.

महाराष्ट्रात 2024 मध्ये बेपत्ता मुलांसाठी 3,495 गुन्हे नोंदविले गेले. यामध्ये 2,057 मुली होत्या तर 1,438 मुले होती. 2024 मध्ये एकूण 3,737 बेपत्ता बालकांचा शोध पूर्ण झाला. त्यामध्ये 2,123 मुली आणि 1,611 मुले तसेच 3 तृतीयपंथी मुले होती. हरवलेल्या मुलांना शोधून काढण्याचे प्रमाण 2023 मधील 64.8 टक्के वरून 2024 मध्ये 67.1 टक्के पर्यंत वाढले आहे. मात्र अजून सुद्धा 1,803 मुलांचा शोध लागलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT