Raju Shetty on Ajit Pawar
नवी दिल्ली : नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आज (दि. १२) आपल्या पदाची आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या सोहळ्यासाठी एनडीएच्या घटकपक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आले आहे, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे समजते. त्यांच्या या अनुपस्थितीवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज (दि. १२) दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांना उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला अजित पवार अनुपस्थित असल्याचे विचारले असता, ते म्हणाले, "अजित पवार स्वतः एवढ्या उचापती करतात त्यामुळं त्यांना अज्ञात वासात जावं लागतंय. ऊस दराच्या बाबत काही कारण नसताना ते कमिटीचे अध्यक्ष बनतात. प्रशासनाचा गैरफायदा घेऊन अजित पवार निर्णय घेतात. त्याचे फळ त्यांना भोगावं लागेल, असे शेट्टी म्हणाले.
कोल्हापुरातील नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी प्रकरणाची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. या प्रकरणावर आज (दि.१२) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टात माधुरी हत्तीणवर आज सुनावणी होत आहे. राज्य सरकारने ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. हत्तीणीला मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेत विनंती केली. 'माधुरी'वर उपचार करता येतील असे सेंटर नांदनी मठात करता येईल, असं राज्य सरकारने सांगितलं आहे. आज काहीतरी चांगला निर्णय येईल, असा विश्वास असल्याचे शेट्टी म्हणाले.
शेट्टी म्हणाले की, साखर कारखानदारांच लाड राज्य सरकार करत आहे. तुकड्या-तुकड्याने पैसे देण्याच्या राज्याच्या निर्णयाला आमचा विरोध आहे. त्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. राज्य सरकारचे वकील अनुपस्थित राहत असल्याने सोमवारी कोर्टाने राज्याला झापलं होत. आज उपस्थित राहिले नाहीत तर प्रकरण निकाली काढू, अस सांगितलं आहे.