नवी मुंबई: गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारावर झाला आहे.
पावसामुळे बाजारात येणाऱ्या मालाची आवक कमी झाली असली, तरी आलेल्या मालालाही अपेक्षित उठाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. भिजलेल्या अवस्थेत आलेला भाजीपाला जास्त काळ टिकत नसल्याने खराब माल कचऱ्यात फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.
एपीएमसीत वाटाणा, मिरची, गवार, आले याला चांगला दर मिळतो. तर भेंडी, वांगी, फ्लॉवर, कोबी, काकडीसह इतर भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. सोमवारी ७१० गाड्यांची आवक झाल्याने मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक झाली.
त्यामुळे अनेक भाज्यांचे दर पडले. फ्लॉवर अक्षरशः पाच आणि सहा रुपये किलोने विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. अशीच स्थिती वांगी, भेंडीची होती. तर गवारला ५० ते ६० रुपये किलोचा दर मिळाला. वाटाणा, आल्याला चांगला दर मिळाला.
मात्र पावसामुळे एकीकडे माल खराब होत असल्याने नुकसान होत आहे. शिवाय, वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने पावसात तो कुजून दुर्गंधी पसरत आहे. बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा बाजारात दररोज मोठ्या प्रमाणात कृषी मालाची आवक-जावक होते.
मात्र, पावसाळा सुरू झाल्यापासून ही साखळी विस्कळीत झाली आहे. शेतातून माल बाजारात पोहोचत असला, तरी तो बहुतांश वेळा भिजलेला असतो. असा माल तातडीने विकला गेला नाही, तर लवकर खराब होतो. मुंबई आणि उपनगरांतही पावसाचा जोर कायम असल्याने बाजारात येणाऱ्या खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे.
फेरीवाले, हातगाडीवाले तसेच पदपथांवर विक्री करणारे लहान व्यापारी बाजारातील माल मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र, पावसामुळे त्यांचाही व्यवसाय ठप्प झाल्याने ते खरेदीसाठी बाजारात येत नाहीत. परिणामी बाजारात माल पडून राहत असून खराब झालेला माल कचऱ्यात टाकावा लागत आहे.