मुंबई : महाविकास आघाडीने एकत्रित येऊन भारतीय जनता पक्षाचे संभाव्य वर्चस्व रोखावे ही केंद्रीय नेतृत्वाची इच्छा असली तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंशी आघाडी करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या स्थानिक आमदारांनी सपशेल अमान्य केला आहे. शनिवारी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी यासंदर्भात चर्चा करताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी पक्षाला मुंबईकर प्रतिसाद देत आहेत. मुंबईत पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी स्वबळावर लढणे आवश्यक आहे असे निक्षून सांगितले.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरू असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे चेन्नीथला म्हणाले. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चेन्नीथला बोलत होते.
ठाकरेेंच्या काळात मुंबईची वाताहत
शिवसेना ठाकरे गटाबद्दल सहानुभूती असली तरी त्यांच्या काळात मुंबईची झालेली वाताहत आणि हिंदुत्वाची त्यांची एकेकाळची भूमिका यामुळे त्यांच्यासमवेत जाणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसला सातत्याने मदतीचा हात देणारा अल्पसंख्यांक वर्गही शिवसेनेकडे वळतो आहे. ते थांबवण्यासाठी आता काँग्रेसला स्वबळावर लढण्याची तयारी करणे भविष्यासाठी आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला समवेत गेल्यास काँग्रेसला आत्ता ज्या मराठी मतदारांचा पाठिंबा मिळतो तो देखील संपेल आणि त्यामुळे नुकसानच होईल. सर्व परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस या निवडणुकीतून पुन्हा उभी राहू शकेल. एकत्र घेण्याचा आग्रह सध्या धरू नका अशीही विनंती करण्यात आली आहे. ही भूमिका पक्ष नेत्यांच्या कानावर घातली जाईल असे आश्वासन चेन्नीथला यांनी दिल्याचेही एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा प्रचंड वापर केला जात आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात आघाडी वर आहे. त्यामुळे जनता सत्ताधारी भाजपवर नाराज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत विजयी करेल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.