Praniti Shinde criticism Central Government
पुढारी ऑनलाईन डेस्क : सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. जसं राक्षसाला रक्त लागतं, तसं भाजपाला दंगली लागतात, एक माणूस दहा हजार लोकासमोर बोलतो, त्याला हिटलर शाही म्हणतात, असे म्हणत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना हल्लाबोल चढवला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या जातनिहाय जनगणनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. हा मुद्दा त्यांनी सातत्याने लावून धरला होता. आता केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु कधी पर्यंत जातीनिहाय जनगणना करणार आहात, ते सरकारने लेखी द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारवर टीका करताना हल्ला झाला. तेव्हा पंतप्रधान मोदी बिहारमध्ये प्रचार करत होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात लाडकी बहिण योजनेचा बोजवारा उडाला असून पैसे नाहीत. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे ७०० कोटी रुपये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना लाडक्या बहिणीला द्यावे लागले आहेत. यावरून महायुतीच्या सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मानसिकतेमुळे महिलांवर अत्याचार होत आहेत, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला. प्रधान मंत्री ग्राम सडक योजना केंद्र सरकाने बंद केली असून राज्यातून दीड वर्षांपासून एकही प्रस्ताव गेलेला नाही, असे शिंदे म्हणाल्या.