

सोलापूर : देशाच्या नागरी उड्डाणमंत्र्यांशी चर्चा करून विमानसेवा सुरू करण्याबाबत मागणी केली आहे. विमानसेवेसाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधार्यांकडून अडथळे आणण्याचे प्रयत्न होत आहेत. तसे न झाल्यास लवकरच विमानसेवा सुरू करू, असे आश्वासन खा. प्रणिती शिंदे यांनी दिले.
खा. शिंदे यांनी मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विमानसेवेबाबत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, मागील सहा महिन्यांपासून सोलापुरातून विमान कधी उडेल, यासाठी आम्ही आकाशाकडे पाहतोय; मात्र विमानसेवा सुरू होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विमानतळाचे लोकार्पण केले. मात्र, विमानसेवा काही सुरू झाली नाही. देशात, राज्यात भाजपची सत्ता असूनही विमानसेवा सुरू होत नाही. हे दुर्दैव आहे. काँग्रेसकडून विमानसेवेसाठी प्रयत्न होत आहेत; परंतु इगोचा प्रश्न येत आहे. सत्ताधार्यांनी अडथळे न आणल्यास लवकरच विमानसेवा सुरू होईल.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅकचे प्रकार उघड होऊ नये, यासाठी लाडकी बहीण पुढे आणून त्यांना जे करायचे तेच केले. लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारची आर्थिक तिजोरी अडचणीत आहे. त्यामुळे या योजनेतील नऊ लाख लाभार्थी कमी होणार आहेत. निधी नसल्याने महायुती सरकारकडून एकही योजना व्यवस्थित राबवली जात नसल्याची टीका खा. शिंदे यांनी केली.