मुंबई : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधीं आणि काॅग्रेस सरचिटणीस खासदार प्रियंका गांधी, यांना दिलेल्या वागणुकीविरोधात काँग्रेसने मुंबईत बुधवारी आक्रमक भूमिका घेत भाजपा विरोधात एल्गार पुकारला.
काँग्रेसने कुलाबा येथील गांधी भवनपासून नरिमन पाॅईंट येथील भाजपा कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते.भाजपा कार्यालयात जाऊन त्यांना संविधान भेट देण्याची काँग्रेसची भूमिका होती.पण; पोलिसांनी काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना रिगल सिनेमाजवळ ताब्यात घेतले.यावेळी ‘मोदी हटाव, देश बचाव’,‘जब जब मोदी डरता है,पुलिस को आगे करता है’,अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मोर्चापूर्वी गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाली.ते म्हणाले,नीटचा पेपर हा काही यावर्षीच फुटला असे नाही तर तब्बल ७१ वेळा पेपर फुटला आहे.मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज हे अभियान हाती घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी लढा पुकारला आहे.
विद्यार्थ्यांना दिलेली वागणूक,दिल्ली पोलिसांचा अत्याचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर माफी मागावी.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. परीक्षांमधील अनियमिततेबाबत संसदेत त्वरित चर्चा करावी. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व एफआयआर त्वरित मागे घ्यावेत, अशा मागण्या असल्याचे सपकाळ म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीच्या गुरुवारच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट यावर शरद पवार व त्यांच्या पक्षातील नेतेच भाष्य करू शकतील, असेही सपकाळ यांनी यावेळी सांगितले.