मुंबई : कुलाबा येथील सबिना चंद्रशेखर मनोरंजन मैदानावर कृत्रिम पृष्ठभाग बसविण्याचे काम स्थानिक क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी बंद पाडले. नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून हे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हे काम नागरिकांचा विरोध डावलून करण्यात येत असल्याचे कुलाबा बॅकगार्डन बचाव समितीचे जितेंद्र तांडेल यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक आमदार व विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्या अट्टहासामुळे कुलाब्यातील स्थानिक फुटबॉल खेळाडूंच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे, असा संतप्त आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कुलाब्यातील हे एकमेव नैसर्गिक पृष्ठभाग असलेले मैदान असून, याच मातीतून अनेक गुणवंत फुटबॉलपटू घडले आहेत.
या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. आज त्याच मातीत कृत्रिम हस्तक्षेप करून त्या परंपरेचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्र आहे.
मैदानाचे नैसर्गिक स्वरूप जतन करण्यासाठी स्थानिकांनी वारंवार निवेदने देऊन प्रशासनाकडे पुनर्विचाराची मागणी केली होती. मात्र कोणतीही सविस्तर चर्चा, लोकांशी संवाद किंवा संबंधितांना विश्वासात न घेता अचानक कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे परिसरात प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. या मैदानाच्या पृष्ठभागात कायमस्वरूपी बदल करण्यापूर्वी स्थानिक क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, माजी खेळाडू आणि नागरिकांचे म्हणणे ऐकणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी होती.
काम सुरू झाल्याची माहिती मिळताच स्थानिक खेळाडू आणि नागरिक मैदानात दाखल झाले आणि शांततापूर्ण पद्धतीने काम बंद पाडले. काम थांबविल्याचे समजल्यानंतर कुलाबा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या दबावालाही न जुमानता स्थानिकांनी आपली भूमिका ठाम ठेवत काम थांबवून घेतले. मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसल्याने स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती देवेंद्र तांडेल यांनी दिली.
येथील मैदानाचा 5 हजार विद्यार्थी वापर करतात. यापैकी फुटबॉल खेळाडूंना टर्फची कमतरता भासत होती. त्यांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेकडून सदर मैदानात टर्फ बनविण्याचे काम सुरू आहे. कुलाब्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना टर्फवर खेळता यावे, यासाठी काम सुरू आहे. एवढ्या वर्षांपासून त्यांनी काही न केल्याने आता त्यांच्या पोटात दुखत आहे. सदर टर्फ हे कुलाब्यातील खेळाडूंसाठी मोफत राहणार आहे.मकरंद नार्वेकर, नगरसेवक