नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नारळपाण्याच्या दरात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. आठवडाभरापूर्वी 70 ते 80 रुपये प्रतिनारळाने मिळणारे नारळपाणी आता 50 ते 70 रुपयांच्या दरम्यान ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने सामान्य ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सध्या बाजारात म्हैसूर येथून मोठ्या प्रमाणात नारळाची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पुरवठा वाढून नारळपाण्याच्या दरात घट झाली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी कमी आवक आणि वाढलेली मागणी यामुळे नारळपाण्याचे दर चढे होते. विशेषत: उष्ण वातावरण, वाढती मागणी आणि फिटनेस तसेच हेल्दी ड्रिंक म्हणून नारळपाण्याची वाढती लोकप्रियता यामुळे रस्त्याकडील स्टॉल्सपासून फळांच्या दुकानांपर्यंत मोठी मागणी निर्माण झाली होती.
दरम्यान, अद्यापही काही ठिकाणी दरात फरक दिसून येत आहे. स्थान, वाहतूक खर्च आणि आकारानुसार नारळाचे भाव बदलत आहेत. तरीही गेल्या आठवड्यापेक्षा ग्राहकांना 10 ते 20 रुपयांची बचत होत असल्याचा आनंद त्यांच्यात दिसून येत आहे. सध्या म्हैसूर येथून नारळाची आवक चांगली आहे. त्यामुळे दरात घट झाली असून पुढील काही दिवस दर स्थिर राहण्याची शक्यता आहे, असे नारळ पाणी विक्रेत्याने सांगितले.