मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकन तस्करीचा पर्दाफाश करून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सव्वाअकरा कोटींचा कोकेनचा साठा जप्त केला आहे.
दोन वेगवेगळ्या कारवायांत या अधिकाऱ्यांनी दोन महिलांसह चार प्रवाशांना अटक केली आहे. ते चौघेही अदिस अबाबा येथून आले होते, त्यांच्याकडून सव्वादोन किलो कोकेनचा साठा या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.
शुक्रवारी पहाटे एक महिला आणि तिच्यासोबत तिचा एक सहकारी अदिस अबाबा येथून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. संशयावरून या दोघांनाही डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी ड्रग्ज कॅप्सुल गिळल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पोटातून 84 कॅप्सुल बाहेर काढण्यात आले होते. त्यात 1.4 किलो कोकेन सापडले. त्याची किंमत सात कोटी इतकी होती.
अशाच प्रकारे 19 मेला या अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना ताब्यात घेतले होते. त्यात एका महिलेचा समावेश होता. त्यांनीही कॅप्सुलद्वारे ड्रग्जची तस्करी केल्याची कबुली दिली होती. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पोटातून 63 कॅप्सुल काढण्यात आले होते. त्यात या अधिकाऱ्यांना 850 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले.
त्याची किंमत सव्वाचार कोटी रुपये इतकी होती. ते दोघेही अदिस अबाबा येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या कारवाईत डीआरआयने आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदिस अबाबा येथून आलेल्या दोन महिलांसह चार प्रवाशांना अटक केली होती.
या चौघांकडून सव्वादोन किलो कोकेनचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सव्वाअकरा कोटी रुपये आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर चौघांनाही किल्ला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.