Trainee Teacher Salary Issue
नवी मुंबई : ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण’ योजनेते अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यासाठी विविध शाळांमध्ये सहाय्यक शिक्षक व बालवाडी मदतनीस म्हणून 76 उमेदवारांनी काम केले. सुरुवातीला चार महिन्यांचे वेतन देण्यात आले. मात्र, उर्वरीत दोन महिन्यांचे वेतन सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी मिळाले नसल्याने युवा योजनेतील शिक्षक हतबल झाले आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सहा महिन्याच्या कालावधीसाठी सप्टेंबर महिन्यात पालिकेतील विविध शाळांमध्ये 16 बालवाडी शिक्षक आणि 12 मदतनीस यांना 6 हजार रुपये त्याचप्रमाणे डी.एड व पदवीधर अहर्ताधारक सहाय्यक 28 शिक्षकांना 8 हजार आणि बी.एड अहर्ताधारक सहाय्यक 20 शिक्षकांना 10 हजार रुपये विद्यावेतन तत्त्वावर सेवेत घेण्यात आले होते. 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत या पदरमोड करून या शिक्षकांनी प्रामाणिकपणे आपले काम केले आहे. मात्र, फेब्रुवारी व मार्च महिन्यातील वेतन शालेय सत्र संपूनही अद्याप देण्यात आलेले नाही.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या दरबारातही शिक्षकांनी नियमित वेतन मिळावे यासाठी प्रश्न मांडला होता. तर पालिका, युवा कार्यालयात हेलपाटे मारुनही ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांनी नोंदणीची तपशीलवार माहिती देण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यालाही महिना होऊन मे महिना उजाडला तरी वेतन मिळाले नाही.
पालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचार्यांनी पुढील वाढीव कालावधी आणि थकीत वेतनासाठी माहिती ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी आपली माहिती युवा प्रशिक्षण कार्यालय, ठाणे येथे पाठवल्याचे सांगितले. तर ठाण्यातील अधिकार्यांनी 6 महिन्यांच्या प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची मुदत वाढ दिल्याने ऑनलाईन अर्जांची नोंदणी पुर्ण झाल्यावर पुढील मंजूरी प्राप्त होताच वेतन देण्यात येईल, असे सांगण्यात आले.