नवी मुंबई: आगामी १५ दिवसांत सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत आणि माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. नवी मुंबईतील माथाडी मेळाव्यात ते बोलत होते. माथाडी कामगारांच्या वडाळा येथील घरांचा प्रश्न, साताऱ्यातील टाटा प्रकल्पातील प्रश्न आणि पुणे-नाशिक येथील कामगारांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कै. आण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पणन मंत्री जयकुमार रावल, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक, माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारने मराठा समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर भर दिला. सारथी संस्थेच्या माध्यमातून १२० हून अधिक आयएएस आणि आयपीएस अधिकारी तसेच १०४८ एमपीएससी अधिकारी तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व अधिकारी आज महाराष्ट्रात नोकरी करत आहेत. सरकार प्रत्येक समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कै. आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाला सर्वाधिक वेळा उपस्थित राहण्याचा विक्रम आपलाच आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने दीड लाख उद्योजक तयार केले असून, त्यांना १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. पुढील काळातही हे महामंडळ सरकारच्या पाठिंब्याने काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना, काही माथाडी कामगारांनी हातात फलक घेऊन आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाषण थांबवत, 'ही आपलीच माणसं आहेत,' असे म्हणत फडणवीस यांनी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत १५ दिवसांत बैठक घेऊन दिवाळीची भेट देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनीही भाषणे दिली. माथाडी कामगारांच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली. त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न आणि एपीएमसीतील अडचणी सरकारसमोर मांडल्या.