मुंबई : महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अनाथ मुलांसोबत संवाद साधला. यावेळी फडणवीस काहीसे भाऊक झालेले पाहायला मिळाले. फडणवीस सरकारने अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे अनेक अनाथ मुलांना सरकारी योजनांचा लाभ झाला होता. महाराष्ट्रातील तरुणांनी स्वप्नं पाहायला घाबरू नका, त्यासाठी संघर्ष करायला मागे हटू नका आणि जेव्हा समोर संधी येईल तिचं सोनं करा, असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
"अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांना आकार देणाऱ्या महत्त्वाकांक्षी तरुणांशी आज संवाद साधताना निःशब्द झालो. २०१८ मध्ये जेव्हा नोकरी आणि शिक्षणात १ टक्के अनाथ आरक्षणाचा निर्णय घेतला, तेव्हा फक्त एक चांगले कार्य करतोय, याची जाणीव होती; पण आज जाणवलं की तो निर्णय कित्येकांच्या आयुष्याचा अंधार चिरून टाकणारा दीप झाला आहे. आयुष्यात काही कामे जन्मभर समाधान देतात, हे त्यातील एक असल्याचे," यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
संघर्ष, अपूर्ण स्वप्नं आणि आधाराची आस, या सगळ्यातून उभं राहून आज जेव्हा हे तरुण विविध जबाबदार पदांवर दिसतात, तेव्हा मन भरून येते. त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेपेक्षाही नव्या स्वप्नांची लकाकी बघण्यात एक वेगळं समाधान आहे. हा कार्यक्रम केवळ सरकारच्या कामाचा उत्सव नव्हता, तर परिवर्तनाचा, सामाजिक न्यायाच्या विजयाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या समतेच्या संधीच्या जाणीवेचा उत्सव होता, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यकाळावर आधारित चित्र प्रदर्शन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळावर आधारित चित्र प्रदर्शनाचे आयोजन कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये करण्यात आले. चित्रकार भरत सिंह यांनी साकारलेल्या ऑईल पेंटिंगच्या माध्यमातून फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या विविध कामांचा आणि महत्त्वपूर्ण उपक्रमांचा आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात आला. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते झाले, यावेळी मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.