मुंबई : राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्ववत सुरू करण्यासह विविध प्रश्न मार्गी लावण्याचे संकेत देत त्यासाठी लवकरच बैठक बोलावू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्ववत सुरू करावा या मुख्य मागणीसह सहकारी संघाच्या विविध प्रश्नांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्न समजून घेत त्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रवीण दरेकर यांना या भेटीत दिले.
गेल्याच महिन्यात 106 वर्षांचा इतिहास असलेल्या राज्य सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक झाली. मागच्या वेळी स्वतंत्रपणे एकमेकांविरुद्ध लढलेले सहकार संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि भाजपचे विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेवरून एकत्र आले. कुसाळकर-दरेकर- शिवाजीराव नलावडे पॅनलने इतिहास घडवला आणि 21 पैकी 20 उमेदवार निवडून आणले. त्यातल्या नऊ जागा तर बिनविरोध जिंकल्या.
महात्मा गांधींच्या उपस्थितीत स्थापन झालेल्या या सहकारी संघावर चालत आलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढत सहकार क्षेत्राला प्रशिक्षण आणि नेतृत्व देणार्या या सहकारी संघाची सूत्रे या पॅनलने हाती घेतली. त्यानंतर राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी भाजपा गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ज्या राज्य सहकारी संघाची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत झाली त्या संघाला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे आहेत. सरकारकडून ज्या गोष्टी हव्या असतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करू. चांगल्या संकल्पना घेऊन संघाचा गाडा पुढे नेऊ, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिला होता. त्यादिशेने पहिले पाऊल गुरुवारच्या मुख्यमंत्री भेटीत पडले. सहकारी संघाच्या सर्व मागण्यांवर संबंधित खात्यांची संयुक्त बैठक बोलावण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांना या भेटीत दिला.