मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दुरावलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकत्र आले आहेत. मात्र, या ‘ठाकरे पॅटर्न’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत निशाणा साधला आहे. ‘या युतीची हवा अशी केली जात आहे, जणू रशिया आणि युक्रेन एकत्र आले आहेत आणि पुतिन-झेलेन्स्की गप्पा मारत आहेत,’ असा टोला फडणवीसांनी लगावला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याने कोणताही परिणाम महायुतीवर होणार नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, ‘ही युती विचारधारेसाठी नसून केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी केलेली धडपड आहे. ज्या पक्षांनी आपली ओळख गमावली आहे, ते आता एकत्र येत आहेत. पण जनता आता अशा राजकारणावर विश्वास ठेवणार नाही.’
मुंबईकरांनी आमची विकासकामे पाहिली आहेत, त्यामुळे मुंबईची जनता महायुतीच्याच पाठीशी उभी आहे. दोन हतबल पक्ष एकत्र आल्याने निवडणुकीच्या निकालात कोणताही बदल होणार नाही. ठाकरेंनी तुष्टीकरणाचे राजकारण करून आपली हक्काची व्होटबँक गमावली आहे, असा आरोप फडणवीसांनी केला.
दुसरीकडे, बुधवारी (दि. २४) एका संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष आता खांद्याला खांदा लावून लढणार आहेत.
‘महाराष्ट्र ज्या दिवसाची दीर्घकाळापासून वाट पाहत होता, तो दिवस आज उजाडला आहे. शिवसेना आणि मनसे आता एक आहेत,’ अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.
तर, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ‘आम्ही केवळ निवडणुकांसाठी नाही, तर कायमचे एकत्र आलो आहोत. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हा निर्णय घेतला आहे.’
१५ जानेवारी रोजी मुंबई, नाशिकसह २९ महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका होत आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेवर गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची (अविभाजित) सत्ता होती. आता ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे ही निवडणूक ‘महायुती विरुद्ध ठाकरे बंधू’ अशी चुरशीची होणार असल्याचे चिन्हे आहेत.