CM Devendra Fadnavis On Honey Trap Case
मुंबई : सध्या सभागृहात हनी ट्रॅपी प्रकरणाची चर्चा होतेय. पण ना हनी आहे ना ट्रॅप. नाना पटोलेंनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवत बॉम्ब आणला होता असं समजतंय. पण नानाभाऊंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. ते गृहखात्यापर्यंत पोहोचवलंच नाहीय, असा टोला लगावतानाच कोणत्याही आजी-माजी मंत्र्याची हनी ट्रॅपची तक्रार नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होत आहे. 72 आजी- माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. गृहखाते हे फडणवीसांच्या अंतर्गतच येत असल्याने त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
फडणवीस म्हणाले, सध्या असं वातावरण झालंय की आजी-माजी मंत्री एकमेकांकडे संशयाने बघत आहेत. कोण फसलंय असा प्रश्न सर्वांना पडू लागलाय. कोणत्याही आजी- मंत्र्यांची हनी ट्रॅपची तक्रार नाही अथवा पुरावेही नाही. अशा बाबतची एक तक्रार नाशिकमधून आली होती. एका महिलेने उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार दिली होती. ही तक्रार महिलेने मागेही घेतली होती. नाशिकच्या ज्या हॉटेलचा उल्लेख होतोय त्या हॉटेलचा मालक काँग्रेसचा उमेदवार होता, असा दावा फडणवीसांनी केला. आरोप करावेत पण पुरावेही ठोस असले पाहिजे, असा टोला त्यांनी पटोलेंना लगावला.
राज्यात गुन्हेगारी वाढली आहे का?
विरोधकांनी राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप केला. यावर फडणवीस म्हणाले, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्हे 11,656 ने कमी आहे. म्हणजे 6.75 टक्क्यांनी गुन्हे कमी झाले आहेत. यात हत्या, दरोडा, हत्येचा प्रयत्न अशा सर्वच स्वरुपाचे गुन्हे कमी झाले आहेत.
सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 2022 मध्ये 16.45 टक्के होते ते आता 19 टक्क्यांवर गेलं आहे. सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्यांपैकी जी काही रक्कम ताब्यात येणाऱ्या रकमेचं प्रमाण 2021 मध्ये 2.75 टक्क्यांवरून 2024 मध्ये 16 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
नागपूरमध्येही गुन्हे कमी झाले आहेत. राज्यात गुन्हे कमी होण्याचे प्रमाण 6.5 टक्के आहे तर नागपूरमध्ये हेच प्रमाण 11 टक्के आहे. नागपूरमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये 12 टक्क्यांची वाढ होतेय.
महिला अत्याचारात वाढ झालीये का?
महिला अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हे उकल होण्याचे प्रमाण 91 टक्के आहे. बलात्काराच्या प्रकरणात 98 टक्के केसेसमध्ये आरोपींना अटक झालीये. दुर्दैवाची बाब म्हणजे बलात्काराच्या प्रकरणांमध्ये 99.52 टक्के आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे किंवा नातेवाईक आहेत.
'झोपडपट्टी मुक्त मुंबई करू'
धारावीबाबत कुठलीही जमीन अदानी समुहाला दिलेली नाही. एसपीव्ही तयार केली असून अदानी हे पार्टनर म्हणून आले आहेत. केवळ १०८ हेक्टर क्षेत्रात काम करायचे आहे. 95,090 कोटी रुपये खर्च होणारेय. पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन तिथेच होईल. 2019 पर्यंत मी चपला धारावीतूनच घ्यायचो. या व्यावसायिकांना धारावीतच जागा देणार आहोत. 2011 नंतरच्या लोकांनाही घर देणार असून 10 लाख लोकांना स्वतःचे घर देणार आहोत. यासाठी 541 एकर जागा ही डीआरपीला देणार आहोत. जगातला सर्वात मोठा हा प्रकल्प असेल. ९० टक्के सर्वेक्षण झाले आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण करू, असंही त्यांनी सांगितले.