संजय गायकवाड यांचे वर्तन योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  (Pudhari Photo)
मुंबई

Devendra Fadnavis on Sanjay Gaikwad | 'एक आमदार बनियन, टॉवेलवर येतो...' संजय गायकवाडांच्या मारहाण प्रकरणाची फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

आमदार संजय गायकवाड यांचा कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

दीपक दि. भांदिगरे

Devendra Fadnavis on Sanjay Gaikwad

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्‍यान, या कृतीचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे गायकवाड यांनी म्हणत, 'जीवाशी खेळाल, मी सोडणार नाही', असा इशाराही दिला. दरम्यान, या घटनेचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, संजय गायकवाड यांच्या कृतीबद्दल निषेध व्यक्त केला.

असे वर्तन योग्य नाही- फडणवीस

''मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असे वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली आहे की भाजीला वास येत होता. पण त्यासाठी मारहाण करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधीने मारहाण करणे योग्य नाही. याबद्दल सभागृहातील अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा,'' असे फडणवीस यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांचे वर्तन भूषणावह नाही, यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते!, असेही फडणवीस म्हणाले.

संजय गायकवाड यांच्या कृतीबद्दल बोलताना अनिल परब विधान परिषदेत म्हणाले, एक आमदार बनियन आणि टॉवेलवर येतो आणि बॉक्सिंग करत असल्यागत एका साध्या माणसाला मारतो. अरे हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्याला मारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ आहे आणि तुम्ही अशा आमदाराचा पाठिंबा घेणार का? आपल्या विधिमंडळ कक्षात सदर विभाग येतो. त्यामुळे तुम्ही त्याला निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.

नेहमीच वादग्रस्त विधानाने चर्चेत असलेले शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड हे मुंबईतील आमदार निवासातील कँटीनमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले.

या घटनेनंतर सकाळी साडे अकराच्या दरम्यान एफडीएच्या पथकाने हॉटेलमध्ये झाडाझडती सुरू केली. तब्बल तीन- चार तास एफडीएचे अधिकारी कँटीनमध्ये तपासणी करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT