HSC Board Exam 2026  Pudhari
मुंबई

HSC exam 2026 : उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

महामुंबईत 3 लाख 50 हजार; ठाणे जिल्ह्यात 1 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मुंबई विभागात यंदा सुमारे 3 लाख 50 हजार 15 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून परीक्षा सुरळीत व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाकडून व्यापक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

मुंबई विभागीय मंडळाच्या अखत्यारीत ठाणे, रायगड, पालघर तसेच मुंबईतील दक्षिण, पश्चिम आणि उत्तर असे तीन विभाग आहेत. या सर्व विभागातून 1 हजार 747 कनिष्ठ महाविद्यालयांमधून सुमारे 3 लाख 52 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 3 लाख 22 हजार विद्यार्थी नियमित आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 8 हजार 54 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. रायगडमधून 33 हजार 121, पालघरमधून 56 हजार 756, दक्षिण मुंबईतून 39 हजार 429, पूर्व उपनगरातून 70 हजार 890 आणि उत्तर विभागातून 41 हजार 765 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

शाखानिहाय विचार केला असता वाणिज्य शाखेसाठी सर्वाधिक 1 लाख 68 हजार 880 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखेत 1 लाख 31 हजार 522 तर कला शाखेत 46 हजार 26 विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी अर्ज केले आहेत. एमसीव्हीसीसाठी 2 हजार 693 आणि इतर शाखांसाठी 3 हजार 88 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. मुंबई विभागात यंदा 670 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रासाठी साडेदहा वाजेपर्यंत, तर दुपारच्या सत्रासाठी अडीच वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. निर्धारित वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तांत्रिक पडताळणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे.

प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक दहा केंद्रांमागे एक अशा पद्धतीने 68 कस्टडी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा काळात गैरप्रकार टाळण्यासाठी 29 भरारी पथके तैनात करण्यात आली असून सहा संवेदनशील केंद्रांवर विशेष नजर ठेवण्यात येणार आहे.

कॉपीप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत राहणार आहे. प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे केंद्रावर पोहोचेपर्यंत मोबाईल चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, विभागातील 670 केंद्रांपैकी 58 केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली नसल्याचे समोर आले आहे. या केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदल करून गैरप्रकार रोखण्याची उपाययोजना मंडळाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT