11th Admission Pudhari
मुंबई

Class 11 Admission: अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी आज अखेरची मुदत

अर्ज दुरुस्ती, पसंतीक्रम भरणे आणि लॉक करण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीसाठी अर्ज भरणे, अर्जातील दुरुस्ती करणे, कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम निश्चित करणे आणि अर्ज लॉक करण्यासाठी आज (९ जून) सायंकाळी ६ वाजेपर्यंतचीच मुदत आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज लॉक करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अर्ज पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाणार नसल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. राज्यातील एकूण ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १३ लाख ४५ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

दुसऱ्या नियमित फेरीत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, अर्जाच्या भाग-१ मधील दुरुस्ती तसेच भाग-२ मध्ये पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

१३ जूनला जाहीर होणार यादी

दुसऱ्या फेरीची प्रवेश यादी १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर केली जाणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना १३ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानंतर १८ जूनपासून तिसऱ्या नियमित फेरीची प्रक्रिया सुरू होणार असून १९ जून रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT