Abhijeet Dipke, Ashutosh Ranka, and Saurav Das File Photo
मुंबई

CJP Lookout Circular: सीजेपीच्या दिपके, दास आणि रांका यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून लुकआउट नोटीस

सीजेपीचे सहसंयोजक सौरव दास, संस्थापक अभिजीत दिपके आणि सहसंयोजक आशुतोष रांका यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआउट सर्क्युलर (एलओसी) जारी केले आहेत.

मोहन कारंडे

मुंबई : सीजेपीच्या २ ऑक्टोबर रोजी दादर येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे सहसंयोजक सौरव दास, संस्थापक अभिजीत दिपके आणि सहसंयोजक आशुतोष रांका यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआउट सर्क्युलर (एलओसी) जारी केले आहेत. दास यांना २३ नोव्हेंबर रोजी लंडनला जाण्यापासून दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले होते. त्यापूर्वी काही तास आधीच त्यांच्या विरोधात एलओसी जारी करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात दिली.

दास यांना त्यांच्या पासपोर्टमधील कथित त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागणारी नोटीस ज्या दिवशी ते ब्रिटनला जाणार होते, त्याच दिवशी बजावण्यात आली होती. या नोटिशीमागील कारण स्पष्ट करण्यासाठी दास यांच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

केंद्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, दास यांना एलओसीला योग्य न्यायालयात आव्हान देता येईल. त्यांच्या पासपोर्टमध्ये अनेक विसंगती आढळल्या असून, त्यांचा नागरिकत्वावर परिणाम होऊ शकतो, या मुद्द्यावरही तपास सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

नोटिशीला उत्तर न दिल्याने एलओसीची प्रत देण्यास नकार

दास यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अखिल सिबल यांनी न्यायमूर्ती अमित महाजन यांना सांगितले की, त्यांच्या अशिलाला त्यांच्या विरोधात 'लुकआउट सर्क्युलर' असल्याचे कधीही सांगण्यात आले नव्हते. त्यांनी या दस्तऐवजाची प्रत आणि त्याचा उद्देश स्पष्ट करण्याची मागणी केली.

पासपोर्टमध्ये वडिलांची माहितीची कोणतीही नोंद नाही

सरकारी वकिलांनी सांगितले की, अंमलबजावणी यंत्रणा पुद्दुचेरी येथे सुरू असलेल्या एका चौकशीच्या निकालाची वाट पाहत आहेत. या चौकशीद्वारे दास यांचे जन्मस्थान, पत्ता आणि पालकांची माहिती पडताळली जात आहे. पासपोर्टमध्ये वडिलांची माहिती देण्याच्या रकान्यात कोणतीही नोंद नाही, तो भाग रिकामा सोडण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा आणि स्टँडिंग काउन्सिल आशिष दीक्षित यांनी सांगितले की, 'लुकआउट सर्क्युलर'ची प्रत दास यांना त्वरित दिली जाऊ शकत नाही, कारण २३ नोव्हेंबर रोजी बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीसला त्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.

शर्मा यांनी सांगितले की, त्या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, दास यांच्या जन्मस्थानाबाबत चुकीची माहिती मिळाल्याचे संकेत आहेत आणि त्यांनी तथ्ये लपवून पासपोर्ट मिळवला आहे. ते म्हणाले, "याबाबत स्पष्टीकरण आणि पुराव्यासाठी कागदपत्रे आवश्यक आहेत; अन्यथा, पासपोर्ट निलंबित किंवा जप्त केला जाऊ शकतो."

प्रवासावर बंदी घालता येणार नाही : सिब्बल

पासपोर्टमधील कथित विसंगतींबाबत कारणे दाखवा नोटीस प्रलंबित असणे म्हणजे प्रवासावर बंदी घालण्याचा अधिकार मिळणे नव्हे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. दास यांचा पासपोर्ट रद्द, निलंबित किंवा जप्त करण्यात आलेला नाही. कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणजे कठोर कारवाई होणारच, असे नाही. दास योग्य वेळी नोटिशीला उत्तर देतील, असे त्यांनी सांगितले. प्रवास करणे हा मूलभूत अधिकार असल्याचेही सिब्बल यांनी न्यायालयात नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT