Mumbai HC New Building:
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांनी बुधवारी (दि.६ नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. यावेळी बोलताना त्यांना इमारतीचं बांधकाम करताना उधळपट्टी न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी न्यायालयाची इमारत ही न्यायाचं मंदिर असतं ते काही सप्त तारांकित हॉटेल नसतं असं देखील म्हटलं.
गवई यांनी आपल्या भाषणावेळी इमारत ही कोर्टासारखीच असावी त्यांनी आर्किटेक्ट हाफीझ काँट्रॅक्टर यांना सांगितलं की ही नवी इमारत लोकशाहीची मुल्ये दर्शवणारी असावी साम्राज्यवादाची प्रतिक नसावी.
गवई म्हणाले, 'न्यायाधीश हे आता कोणी लॉर्ड राहिलेले नाहीत. ज्यावेळी नव्या न्यायालयाच्या इमारतीचं प्लॅनिंग केलं जाईल त्यावेळी आपण न्यायाधीशांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. मात्र आपण अपिल करणाऱ्या न्यायाच्या अपेक्षेने कोर्टात येणाऱ्या नागरिकांना देखील विसरून चालणार नाही. न्याय व्यवस्थेच्या सुवर्ण रथाचे बार आणि बेंच ही चाकं आहेत.'
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिल्डिंग निर्माणकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाची नवी इमारत ही लोकशाहीची भव्यता दर्शवणारी असावी अशी विनंती केली.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई यांनी यापूर्वी गोरेगाव इथल्या महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठात प्रकल्प प्रारंभ समारंभाचं उद्घाटन देखील केलं. गवई यांनी त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून असलेल्या कार्यकाळातील हा राज्याचा शेवटचा दौरा आहे असं सांगितलं. त्यांचा कार्यकाळ हा २४ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
ते म्हणाले, 'मला या कार्यक्रमाचा भाग होण्याची फारशी इच्छा नव्हती. मात्र मला ज्या मुंबई उच्च न्यायालयात आपण जज म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं त्याच्या नव्या इमारतीची पायाभरणी करून माझ्या कारकीर्दीची सांगता होत आहे याची कृतज्ञता आहे. न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी घटनेशी बांधील राहून समाजाला न्याय देण्यासाठी काम करावं.'