

कोल्हापूर : आपल्या विचारांशी कोणतीही तडजोड न करता संघर्षातून उभे राहत, पत्रकारितेचा व्रतस्थ वारसा जपणार्या दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब जाधव यांनी आपल्या लेखणीतून अनेकांना जीवनाचा मार्ग दाखवला. जनतेनेच त्यांना पुढारीपण बहाल केले, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. डॉ. जाधव यांचे ‘सिंहायन’ पुस्तक म्हणजे राज्याच्या राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्वप्रकारच्या जडणघडणीचा इतिहास, मागोवा बाळासाहेबांच्या नजरेतून वाहत आहे, असे ते म्हणाले.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्रचंद्रदर्शन सोहळा आणि ‘सिंहायन’ या आत्मचरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार होते. यावेळी व्यासपीठावर ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आदींसह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव नागरी गौरव समितीच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा शरद पवार आणि फडणवीस यांच्या हस्ते तलवार आणि सन्मानचिन्ह तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला, तर सौ. गीतादेवी जाधव यांचा पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिस परेड मैदानावर बुधवारी अलोट जनसागराच्या साक्षीने हा दिमाखदार सोहळा झाला.
फडणवीस म्हणाले, बाळासाहेब जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे आणि त्याला आपल्याला गेले पाहिजे ही प्रत्येकाची भावना होती. हेच समाजाचे प्रेम बाळासाहेबांनी कमावले आहे. सहस्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे ज्यांनी एक हजार पौर्णिमेचे चंद्र पाहिले आहेत, तेवढा त्यांचा अनुभवही आहे, असे मानले जाते; पण एक हजार पौर्णिमांबरोबर त्यांनी एक हजार अमावस्याही पाहिलेल्या आहेत. त्यांचा सामना केलेला आहे. या सर्वाचे मूल्यमापन केले जाते, त्यावेळी त्यांनी जीवनात कमावलेला परिपाक म्हणजे हा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आहे आणि विशेष म्हणजे तो सर्व समाज मिळून करत आहे, याचा आनंद आहे.
डॉ. जाधव यांचे कोल्हापूरच्या जडणघडणीतील योगदान मोलाचे
व्यासपीठावरील बाळासाहेब जाधव आणि ज्येष्ठ नेते शरद पवार ही महाराष्ट्राच्या जडणघडणीची सर्व वाटचाल पाहणारी माणसे आहेत. असे म्हणतात, ‘ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये.’ मात्र, बाळासाहेबांनी आपल्या कुळाचा शोध घेतला आणि प्रभू श्रीकृष्णापर्यंत ते पोहोचले. यादवांचे जाधव झाले. यादव साम्राज्यापासून ते राजे लखोजीराव जाधव यांच्यापर्यंतचा सर्व इतिहास मांडत, आपल्या कुळाचा इतिहास सांगत त्यांनी आपल्या आत्मचरित्राची सुरुवात केली आहे. मी नुकताच बिहारमध्ये होतो, या ठिकाणी यादवांना जाधवच म्हणतात, यामुळे जाधव हा काही अपभ्रंश नाही. बाळासाहेब जाधव यांचे हे आत्मचरित्र आपल्याला संपूर्ण अद्याप वाचता आले नाही. मात्र, जेवढे चाळले ते पाहता, शरद पवार यांनी बनवलेल्या सरकारपासून ते आपण आणि शिंदे यांनी बनवलेल्या सरकारपर्यंतच्या, अॅक्सिडेंटल सरकारचा आढावा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात घेतला आहे. आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांची झालेली गळचेपी, वेगवेगळ्या निर्णयांविरोधात त्यांनी घेतलेली भूमिका, शेतकर्यांचे लढे, सामाजिक लढे यासह कोल्हापूरच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान हे सर्व या आत्मचरित्रात पाहायला मिळते.
‘पुढारी’ची देदीप्यमान परंपरा तरुण वयातच त्यांच्याकडे आली, असे सांगत फडणवीस म्हणाले, आपल्या जन्माच्या अगोदर एक वर्षापासून बाळासाहेबांनी पत्रकारितेचा वसा घेतला. व्यवसाय म्हणून नव्हे, तर पत्रकारितेची जाणीव ठेवून ‘पुढारी’चा व्रतस्थ वारसा जपला. त्यांनी विचारांची तडजोड करायची नाही, ही भूमिका कायम ठेवली. हा कृतज्ञ सोहळा म्हणजे जीवनाचा मार्ग सापडला, असे समजले जाते. बाळासाहेबांनी आपल्या लेखणीतून अनेकांना जीवनाचा मार्ग दाखवला. ऊस दर आंदोलन, टोलमुक्ती आंदोलन, शेतकर्यांचे प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न, खंडपीठाचा प्रश्न अशा जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांची रोखठोक भूमिका पाहायला मिळते.
बाळासाहेब केवळ प्रश्न मांडणारे नाहीत, तर त्या प्रश्नाचे सोल्युशन देणारेही आहेत, असे सांगत फडणवीस म्हणाले, नेता आणि पुढारी यांच्यात काय अंतर असते हे आपण बाळासाहेबांच्या रूपाने पाहतो. जनतेच्या प्रश्नावरील आंदोलनात ते सहभागी होतात; पण त्याचबरोबर पुढाकार घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. जनतेच्या प्रश्नात मार्ग कसा निघेल, यासाठीच त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. टोल आंदोलन असो, मराठा आरक्षणाचा लढा असो, त्यांनी प्रत्येक आंदोलनात मार्ग काढण्याची भूमिका घेतली. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी गोलमेज परिषद घेतली. केवळ मराठा आरक्षणच नव्हे, तर मराठा समाजाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी काय करता येईल आणि कसे करता येईल, याबाबत चर्चा केली आणि त्यातून मराठा समाजाच्या विकासाचा रोड मॅप तयार करण्याचे काम त्यांनी केले.
एखादे काम झाले की, राजकारण्यांना लोक विचारत नाहीत. मात्र, टोलमुक्तीचा निर्णय झाल्यानंतर पुढाकार घेऊन बाळासाहेबांनी आपला सत्कार केला, असे सांगत फडणवीस म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन जातानाच आपली रोखठोक भूमिका मांडत, जे घडवायचे आहे ते ‘पुढारी’च्या माध्यमातून घडवून आणण्याचे काम त्यांनी केले. आपले विचार बाजूला ठेवून, निर्णय करू शकते असे अराजकीय व्यासपीठ ‘पुढारी’ने उपलब्ध करून दिले, त्यामुळेच कोल्हापूरच्या विकासाला सातत्याने चालना मिळाली.
खर्या अर्थाने पुढारपण
दुसर्याला शिकवण देणे, इतकेच काम बाळासाहेब जाधव यांनी कधी केले नाही, त्यांनी खर्या अर्थाने पुढारपण केले. गुजरातमध्ये बांधलेले हॉस्पिटल असो, सियाचीनमध्ये उभारलेले हॉस्पिटल असो. हे केवळ बांधून दिले असे झाले नाही, तर या रुग्णालयांना आजही ते मदत करत आहेत. त्यांनी सांगितलेले आहे, व्यक्ती रिटायर होतात; पण त्यांचे विचार रिटायर होऊ शकत नाहीत. अजूनही ते जनतेची सेवा करत राहतील. अन्यायाविरुद्ध आसूड ओढत राहतील. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांचे तरुणपणाचे फोटो बघितले, त्यांचे राजबिंडे रूप पाहता, ते जर सिनेमात गेले असते, तर त्यांनी रमेश देव यांनाही टक्कर दिली असती; पण सिनेमातले हीरो होण्यापेक्षा पत्रकारितेतील हीरो होण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ते तसे झाले. ते तसेच शरद पवार जेव्हा शतकपूर्ती करतील, तेव्हा या व्यासपीठावरील सर्व नेते उपस्थित असू, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या..
डॉ. जाधव यांच्याकडून इतिहासाचे दाखले मिळतात
कोणत्याही विषयावर आम्ही जेव्हा जेव्हा बाळासाहेब यांच्याशी चर्चा करतो, तेव्हा तेव्हा आम्हाला इतिहासाचे महत्त्वाचे दाखले मिळतात, असेही फडणवीस यांनी सांगितले.
‘पुढारी’ची चौफेर घोडदौड
पत्रकारितेतील सर्व क्षेत्रातील अस्तित्व बाळासाहेब यांनी अचूक हेरले आणि वृत्तपत्रासोबतच, रेडिओ, डिजिटल, न्यूज चॅनल अशा सर्वच प्लॅटफॉर्मचा वापर सुरू केला आहे. या प्रत्येक प्लॅटफॉर्मचा रिच दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यातून पुढारी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्याची चौफेर घोडदौड सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
विधिमंडळाचे अधिवेशनच येथे घेता आले असते
फडणवीस म्हणाले, मंचावर बसलेले मंत्रिमंडळातील सर्व सहकारी पाहता मंगळवारीच मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती, ती बैठक आज येथे घेतली असती तरी चालले असते. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती ही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशनही या ठिकाणी घेता आले असते, अशी परिस्थिती आहे.
एकनाथ शिंदे सीएम पद परत करतात
सोहळ्यास पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो; मात्र महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने मुंबईस जाणार आहे. मी व एकनाथ शिंदे अदलाबदल करीत असतो. कधी ते मुख्यमंत्री, कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते उपमुख्यमंत्री कधी मी उपमुख्यमंत्री असतो. ते प्रामाणिक आहेत. ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतात. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचे भाषण करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.