Cipla License Cancellation Pudhari
मुंबई

Cipla License Cancellation: सिप्लाला मोठा धक्का! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री-वितरण परवाना रद्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर जाहिरात केल्याप्रकरणी तसेच औषधांची साठवणूक, अभिलेख आणि साठा व्यवस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या सी अँड एफ गोदामाचा औषध विक्री-वितरण परवाना रद्द केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १ ऑक्टोबर रोजी आदेश पारित करण्यात आला.

वडकी येथील गोदामाच्या तपासणीदरम्यान ‘रिॲक्टिन प्लस’ या अनुसूची एच औषधाचा साठा आढळला. तपासणीदरम्यान खरेदी पावत्यांमध्ये आवश्यक अनुक्रमांकाचा अभाव, विक्री पावत्यांच्या दुय्यम प्रतींवर सक्षम व्यक्तीच्या स्वाक्षरीबाबत त्रुटी तसेच संगणकीय प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष औषधसाठ्यामध्ये तफावत आढळली.

या तफावतीमध्ये प्रतिजैविक औषधांचाही समावेश होता. कंपनीने लेखी उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान विविध स्पष्टीकरणे दिली. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पूर्वीची कार्यवाही मागे घेऊन ४ सप्टेंबर रोजी सुधारित कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

प्रभावी औषधे उपलब्ध करून देणार : सिप्ला

पुण्यातील कंपनीचे सी अँड एफ केंद्र औषधांच्या साठवणूक वितरणा संदर्भातील निर्धारित नियम मानकांचे पालन करते. अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशाचा आढावा घेत असून, पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार केला जात असल्याचे सिप्लाकडून सांगण्यात आले आहे.

रुग्ण आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना सुरक्षित, उच्च दर्जाची आणि प्रभावी औषधे उपलब्ध करून देण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचेही सिप्लाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT